Your Own Digital Platform

आमदारांची एकजूट


महाराष्ट्रातील राजकारण सध्या वेगवेगळी वळणं घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आमदार फुटाफुटीची भीती काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तिन्ही पक्षात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या 162 आमदारांची परेड ग्रँड हयात हॉटेलमध्ये घेण्यात आली. तसेच, यावेळी त्यांना आम्ही एकजूटीने राहू अशी शपथही देण्यात आली.

यापूर्वी, रविवार-सोमवार सुनावनी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शनिवारी गुपचुप पार पडलेल्या शपथ ग्रहणविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून शनिवारी रात्री सुप्रीम कोर्टात गेले होते. दुसरीकडे संसदेतही याप्रकरणावर जोरदार प्रदर्शन झाले.

महाराष्ट्रात फ्लोर टेस्टवरुन सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावनीदरम्यान शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना 162 आमदारांचे समर्थन पत्र सोपवले. दरम्यान, तिन्ही पक्षाने आधी सुप्रीम कोर्टात 154 आमदारांचे शपथपत्र दिले, जे त्यांना परत घ्यावे लागले. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पक्षापासून फारकत घेऊन उपमुख्यमंत्री बनलेल्या अजित पवारांच्या भूमिकेवर भाष्य केले. ते म्हणाले, अजित पवारांच्या वागणुकीमागे माझा हात नाहीये. भाजपला समर्थन देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणे हा अजित पवारांचा वयक्तिक निर्णय होता, यात पक्षाचा काहीच हात नाहीये. अजित पवारांच्या बंडखोरीमागे माझा काहीच हात नाहीये. माझा त्यांच्याशी काहीच संपर्क झालेला नाहीये. त्यांची पक्षातून हकालपट्टी करायची का नाही, हा पक्षातील सर्व नेते मिळून घेतील. यात काही दुमत नाहीये की, राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन करेल. असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ठामपणे सांगत आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या 162 आमदारांच्या समर्थनाचे पत्र सोमवारी राज्यपालांना सुपूर्द केले आहे. तर भाजपकडून अजित पवारांनी व्हीप बजावल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आमच्याच पाठीशी असणार आहेत असे भासवले जात आहे. भाजपचे नेते आशीष शेलार यांनी सांगितल्याप्रमाणे, अजित पवार अजुनही राष्ट्रवादीच्या आमदारांचे गटनेते आहेत. त्यांना कायदेशीररित्या पदावरून काढण्यात आलेले नाही. त्यामुळे, आमदारांना व्हिप जारी करण्याचे अधिकार अजित पवारांनाच आहेत. तिन्ही पक्षांनी सोमवारी राज्यपालांना आमदारांच्या समर्थनाचे पत्र दिले तरी त्यावर अजित पवारांची स्वाक्षरी नाही. अशात त्यांचे पत्र वैध धरले जाऊ शकत नाही. असेही आशीष शेलार म्हणाले आहेत.

एकूणच भारतीय जनता पार्टी व अजित पवार यांचा राजकीय डाव उलथवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आमदारांच्यात एकजूट ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र ऐन मोक्याच्या वेळेला आमदारांची ही एकजूट कुणाच्या बाजूने उभी राहते हे पाहणे देखील औत्सुक्याचे आहे.