Your Own Digital Platform

अविनाश कदमांच्या दणक्यामुळे व्यंकटपुर्‍यातील रस्त्यांचे काम सुरु


स्थैर्य, सातारा: सातारा शहरातील व्यंकटपूरा पेठेतील सर्व रस्ते भुयारी गटर योजनेच्या कामासाठी खोदण्यात आले होते. सदर रस्त्यांची दुर्दशा झाली असून वाहन चालक आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. रस्ते दुरुस्तीबाबत टाळाटाळ होत असून व्यंकटपूरापेठेतील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा नगरपालिका कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन छेडू असा इशार नगरसेवक अविनाश कदम यांनी आठ दिवसांपुर्वी दिला होता. कदम यांच्या दणक्यामुळे पालिका प्रशासनाला जाग आली असून व्यंकटपुरा पेठेतील रस्त्यांचे काम सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसांत पेठेतील सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पुर्ण करा आणि गेंडामाळ नाका ते कोटेश्वर मंदीर या रस्त्यांचे काम सुरु करा. अन्यथा पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा कदम यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.
 
व्यंकटपुरा पेठेतील रस्ते आणि गेंडामाळ जकात नाका ते कोटेश्वर मंदीर या रस्त्याची मोठ्याप्रमाणात दुरावस्ता झाली असून या रस्त्यांचे काम सुरु करण्याची मागणी वारंवार करुनही काम केले जात नसल्याने नगसेवक कदम यांनी दि. 25 रोजी रास्ता रोको आणि बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाने आज सकाळी वेंकटपुरा पेठ आणि गेंडामाळ नाका ते कोटेश्वर मंदीर या रस्त्याचे काम हाती घेतले. दरम्यान, आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या नगरसेवक कदम यांना शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरिक्षक मुगुट पाटील यांनी चर्चेसाठी बोलावून घेतले. यावेळी पालिकेच्या अभियंत्यांना आणि ठेकेदारासही बोलावून चर्चा करण्यात आली. दरम्यान, काम चालू झाले असून आंदोलन करु नये, अशी विंनती पोलीस निरिक्षक पाटील यांनी केली. यानंतर कदम यांनी सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी नगरअभियंता भाऊसाहेब पाटील, धैर्यशील शिंदे, एमजेपीचे अग्रवाल, संजय पवार, विनीत कुलकर्णी, संजय ढवळे, संदीप शिंदे, संजय जाधव, सुनिल प्रभुणे आणि नागरिक उपस्थित होते.
 
दरम्यान, व्यंकटपुरा पेठेत रस्त्यांवरील खड्डे मुजवण्याचे काम सुरु असून हेे काम दर्जेदार करावे. केवळ मलमपट्टी करु नये. तसेच गेंडामाळ नाका ते कोटेश्वर मंदीर या रस्त्यावर सध्या झाडलोट आणि खडी टाकण्याचे काम सुरु असल्याचे दिसत आहे. येत्या आठ दिवसांत व्यंकटपुरा पेठेतील रस्त्यांचे काम पुर्ण करावे आणि तसेच गेंडामाळ नाका ते कोटेश्वर मंदीर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु करावे. अन्यथा पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा, लागेल असा इशारा नगरसेवक कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.