Your Own Digital Platform

राधिका रस्त्याचे ‘पॅचिंग’ खोळंबले


स्थैर्य, सातारा: सातारा शहरातील वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असणार्‍या राधिका रोडचे पॅचिंग अजूनही निविदा प्रक्रियेतच खोळंबले आहे निविदा उघडण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर असल्याने अजून आठवडाभर राधिका रोड खड्डयातच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे . सातारा पालिकेच्या या कागदी घोडयांविषयी संताप व्यक्त केला जात आहे.
 
सातारा शहराचा कारभार हाकणारे कारभारी बेफिकिर राहिल्यावर पायाभूत सुविधांचे कसे वाटोळे होते ? याचा सातारा शहरात पदोपदी प्रत्ययं येत आहे . माजी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी शहरातील खड्डे युध्दपातळीवर बुजवण्याचे आदेश दिल्यानंतरही आधी परतीच्या पावसाचे कारण, नंतर शहरातील रस्त्यांचा कमराबंद सर्वे, आता निविदा प्रक्रिया अशा कागदी घोडयातच पालिकेने मागचे बारा दिवस वेळकाढूपणा केला . तांत्रिक परवानगी ही कायदेशीर बाजू मान्य केली तरी कार्योत्तर मंजूरीचा पर्याय सुध्दा होताच . नागरिकांना दयावयाच्या सुविधांमध्येच सार्वजनिक बांधकाम विभाग नियमावर बोट ठेऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
 
पालिकेच्या बांधकाम विभागाकडून शहरातील रस्त्यांच्या पॅचिंग कामाच्या इ निविदांची माहिती घेतली . पहिल्या टप्प्यात एक ते वीस वॉर्डातील रस्त्यांचे पॅचिंग हातात घेण्यात आले आहे त्यामध्ये दीड किलोमीटरच्या राधिका रोडच्या पॅचिंगचे बजेट सरासरी दहा लाख दर्शवण्यात आले आहे. मात्र, निविदा 25 नोव्हेंबरला उघडली जाणार आणि कार्यादेशानंतर ठेकेदार दोन दिवसानी काम सुरू करणार म्हणजेच राधिका रोडची डागडुजी प्रत्यक्षात सुरू व्हायला एक आठवडयाचा कालावधी जाणार हे स्पष्ट आहे.
 
सातारा बस स्थानकाकडून राजवाड्याला जाण्यासाठी राधिका रोड हा सोयीचा मार्ग आहे . करंजे, शाहूपुरी तसेच बुधवार नाक्यावरून मोळाच्या ओढयाला जाण्यासाठी हाच रस्ता सोयीचा आहे . मोठमोठी व्यापारी संकुले, हॉस्पिटल्स, बँका हॉटेल्स,वेअर हाऊस यामुळे या रस्त्याला कार्पोरेट स्ट्रीट म्हणतात .2016 मध्ये तब्बल सत्तर लाख रूपये खर्च करून हा रस्ता चकाचक करण्यात आला होता . राधिका संकुल, ढोर गल्ली कॉर्नर, कर्मवीर कॉलनी, सातारा तालुका पोलीस स्टेशन सह मार्केट यार्ड परिसर खड्ड्यात गेल्याने वाहन चालकांना मणक्याच्या दुखण्यांनी ग्रासले आहे . या रस्त्यावर वाहतुकीचा ताण प्रचंड असताना राधिका रोडच दुरूस्तीसाठी पहिल्यांदा हाती घेणे अपेक्षित असताना पालिकेला बोगदा ते शाहू चौक या रस्त्याचा साक्षात्कार झाला . अजूनही आठ दिवस सातारकरांना राधिका रोडवरून धुळीतूनच प्रवास करावा लागणार आहे.
 
मतभेदांचा फटका सामान्यांना... 

पालिकेच्या बांधकाम विभागाची उफराटी धोरणे आणि अंतः स्थ मतभेद याचाच फटका शहराच्या विकासाला बसत आहे .ई निविदा प्रक्रिया गरजेची असली तरी युध्दपातळीवर रस्त्यांची दुरुस्ती महत्वाची आहे . तिथे थेट आदेश असतानाही पालिकेने कागदी घोडे नाचवले . त्याचा त्रास विनाकारण सातारकरांना होत आहे . खोकला आणि श्वसनाचे विकार असणार्‍या रुग्णांमध्ये धुळीच्या त्रासाने वाढ झाली आहे. 

परतीच्या पावसाने उघडीप उशिरा घेतल्याने प्रत्यक्ष कामाला विलंब झाला . शहरात पॅचिंगच्या कामाला सुरवात झाली आहे . राधिका रोडचे पॅचिंगला निविदा प्रक्रियेनंतर ताबडतोब सुरवात करण्यात येईल.

-शंकर गोरे,
मुख्याधिकारी सातारा नगरपरिषद .