Your Own Digital Platform

मिलींद नेवसेंच्या त्रासाला कंटाळून स्वेच्छा निवृत्तीमुश्ताक महात यांचा मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे विनंती अर्ज; पदाधिकार्‍यांपाठोपाठ कर्मचार्‍यांचाही बळी?

स्थैर्य, सातारा (चैतन्य रुद्रभटे) : फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे यांचे पती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मिलींद नेवसे यांच्या पालिका कंटाळली आहे. पालिकेतील सहाय्यक कार्यकारी निरीक्षक मुश्ताकअहमद अब्दुललतिफ महात यांनी स्वेच्छा निवृत्ती मिळण्याबाबत मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे अर्ज केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अचानक उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी राजीनामा दिला होता. भोईटे यांनी का राजीनामा दिला, याचे कारण जाहीर केलेले नाही. जाहीररित्या भोईटे यांनी आजारपणाचे कारण दिले असले तरी खाजगीत हे आजारपण औषध व्यवसायिकांचेच असल्याचे मत व्यक्त केले जाते. 

मुश्ताकमहम्मद महात यांनी मुख्याधिकार्‍यांना स्वेच्छा निवृत्तीबाबत दिलेल्या अर्जात महात यांनी नमूद केले आहे की, नगराध्यक्षांचे पती वारंवार त्रास देत आहेत. जातीवाचक आयाबहिणींवरुन शिव्या दिल्याबाबत दाढी कापीन दाढी जाळून टाकीन, अशाप्रकारचे मानहानीकारक वागणूक देत आहेत. यापूर्वी आपणास अवगत आहे. आपले मत, आपला राग नगराध्यक्षांमार्फत सतत व्यक्त करत आहेच. आजही स्थायी समितीची सभा झाल्यानंतर नगराध्यक्षांच्या समोर मला अपमानास्पद वागणूक देवून जा तुला कोणाला सांगाचेय ते सांग, कुठेही तक्रार कर, असे बोलून अध्यक्षांमार्फत बाहेर कुठेही बदली करुन तुमच्यावर अ‍ॅक्शन घेईल, असे ते म्हणाले.
 
कार्यालयातील काही जण त्यांछ्या घरी जावून माझ्याबद्दल चुकीचे सांगूनही माझ्याबद्दल मत कलुषीत करीत आहेत. प्रशासनाने माझ्यावर जबाबदारी व कामे दिली ती प्रामाणिकपणे मी निभावीत आहे. असे असताना माझी सतत दनामी करणे मानहानी करणे, हे प्रकार सुरु आहेत. यातून माझी काम करण्याची मानसिकता बिघडण्याचे कृत्य नगराध्यक्षांच्या पती कार्यालयातील काही जणांना हाताशी धरुन करीत आहेत. 

आजही नगराध्यक्षांच्या समोर त्यांच्या पतींनी केबीनमध्ये बोलावून मला बडबड केली आहे.
या सततच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या सेवेची निवृत्ती घेत आहे. मी मुस्लिम समाजातील असल्याने मला सतत हीन वागणूक दिली जात आहे. नगराध्यांच्या पतींकडून मिळणारी वाईट वागणूक तसेच कार्यालयातली काही जणांकडून माझ्या बाबतीत गैरसंदेश पसरवणे त्यामुळे मला काम करणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे विनंती करतो की मला सेवेतून मुक्त करावे.
 
उद्भवणार्‍या प्रापंचिक समस्या शाररीक व मानसिक त्रास वाढल्यास व त्यातून माझ्या कुटूंबाचे मानसिक संतुलन बिघडल्यास नगराध्यक्षांचे पती व कार्यालयातील काही जण जबाबदार राहतील, असे मुश्ताकमहम्मद महात यांनी मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या अर्जात नमूद केले आहे. 

मुश्ताकमहम्मद महात यांच्याप्रमाणेच आणखी काही कर्मचार्‍यांचा समुह नगराध्यक्षांच्या पतींच्या विरोधात मुख्याधिकार्‍यांकडे अर्ज दाखल करणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर येते आहे.
 
दरम्यान, मिलींद नेवसे यांच्या विरोधात एवढे वातावरण का ढवळले गेले आहे? याचे आत्मचिंतन राजेगटाने करणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीत एकत्रित आलेल्या राजेगटाने दीपक चव्हाणांच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण, शहरातील स्थानिक पातळीवर काम करत असलेल्या कार्यकर्त्यांची मने कलुषित झाल्यास या अंतर्गत वादाचे पडसाद निवडणुकीतही दिसून येतात, याचे उदाहरण गतवेळेसच्या नगरपालिका निवडणुकीत मलठणात दिसून आले. मलठणातील राजेगटाअंतर्गत असलेल्या दुहीचा फायदा निश्चितच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटाला झाला. आगामी काळात हाच प्रकार शहरात इतरत्रही घडायला लागल्यास याचे दुष्परिणाम निश्चितच समोर येतील. यावर वेळीच जालीम उपाय काढण्याची गरज आहे. 

अवघ्या दोन ते तीन वर्षांवर नगरपालिकेची निवडणुक येवून ठेपली आहे. नगरपालिकेच्यादृष्टीने उत्साही कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणीही सुरु केलेली आहे. पण, आगामी काळातील निवडणुक ही नेवसेंच्या कामकाजावर आरोप करण्यातच जाते की काय? अशी शंका अनेकांच्या मनी येत आहे. 

राजेगटाअंतर्गत पॅचवर्क महत्वाचे
नेवसे यांचे कारण देत आज एका कर्मचार्‍याने स्वेच्छा निवृत्ती घेण्यासाठी अर्ज केला. पण, या अर्जामागचे रामायण केवळ प्रभू श्रीरामचंद्रानांच माहित असणार, यात शंका नाही. असो, अंतर्गत धूसपूस आणि त्याचे नगरपालिकेच्या कामकाजावर होणारे परिणाम रोखायचे असतील तर राजेगटाअंतर्गत पॅचवर्क करणे महत्वाचे आहे. आणि हे पॅचवर्क दस्तुरखुद्द ना. श्रीमंत रामराजेंनीच करावे. एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा, असे म्हटले जात आहे.

रघुनाथराजेंनी नगरपालिका सांभाळावी
राजेगटाचे आधारस्तंभ व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंंबाळकर यांनी नगरपालिकेचा कारभार हातात घ्यावा. श्रीमंत रघुनाथराजे नगराध्यक्ष असताना झालेल्या शहर विकासाच्या योजना सध्या प्रत्यक्षात येताना दिसत आहेत. श्रीमंत रघुनाथराजेंच्या दूरदृष्टीचा उपयोग राजेगटाने करुन घ्यावा व नेवसेंमुळे नगरपालिकेत तयार झालेले कलुषीत वातावरण स्वच्छ करावे, असे मत नगरपालिकेच्या वर्तुळात व्यक्त केले जाते.

भोईटेंचा राजीनामा भुषणावह नाही
 नंदकुमार भोईटे यांनी उपनगराध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा हा भुषणावह नाही. भोईटे यांनी आजारपणाचे कारण देत राजीनामा दिला असला तरीही यापूर्वी ते अनेकदा आजारी होते. त्यावेळेस कधीही त्यांनी राजीनामा दिला नाही. मात्र, भोईटे यांनी आत्ताच का राजीनामा दिला? याची उकल तज्ज्ञांना झालेली नाही. भोईटेंचा राजीनामा आगामी काळातील निवडणुकीत गाजेल, अशी शंकाही व्यक्त होते आहे.