संजीवनी ढाणेला पंचांच्या भूमिकेचा फटका


स्थैर्य, सातारा : राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत आखाडयात विजेती ठरलेली महाराष्ट्राची संजीवनी ढाणेला पंचांच्या पक्षपाती भूमिकेचा चांगलाच फटका बसला. रौप्यपदकावर समाधान मानावे लागल्यामुळे हताश झालेल्या संजीवनीला हातातोंडाशी आलेल्या सुवर्णपदकापासून तिला वंचित रहावे लागले. पंचांच्या भूमिकेबद्दल तीचे पालक आण्णासाहेब ढाणे यांनी आक्षेप घेतला असून क्रीडा विभागाने तीला न्याय द्यावा, अशी मागणी ढाणे यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नुकतीच दिल्ली येथील छत्रसाल आखाडयात या राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. सुरवातीपासून नेत्रदीपक कुस्त्या करून तीने अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत दिल्लीच्या आदिती कुमारी बरोबर लढत झाली. अटीतटीच्या लढतीत संजीवनीने आदितीला चितपट केले. पंचांनी शिट्टी वाजवली. मात्र, साईडपंच यांनी वेळ संपल्याचे कारण पुढे करून कुस्ती गुणावर घेतली. यामध्ये देखील दिल्लीच्या पैलवानांना चुकीचे गुण बहाल करून पंचांनी विजयी करण्यासाठी हातभार लावला आणि संजीवनीला सुवर्णपदकापासून वंचित ठेवले. भारतीय कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांना भेटून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. मात्र, पंचांच्या पक्षपाती वागणुकीबद्दल कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

No comments

Powered by Blogger.