आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

फलटण येथील ऐतिहासिक श्री प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रा उत्सवात संपन्न


संस्थान काळापासून सुरु असलेली येथील ऐतिहासिक श्री प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रा यावर्षीही फलटणसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत परंपरागत पध्दतीने मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाली. रथोत्सवातील आज(बुधवार दि. २७) रोजी मुख्य दिवशी प्रभू श्रीरामाच्या रथाची नगर प्रदक्षिणा भक्तीमय वातावरणात संपन्न झाली.
 
नाईक निंबाळकर राजघराण्यातील साध्वी श्रीमंत सगुणामाता आईसाहेब यांनी सुमारे २६० वर्षांपूर्वी रथयात्रेची परंपरा सुरु केली असून आजही ती परंपरागत पध्दतीने सुरु आहे. दरवर्षी मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेला म्हणजे देवदिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीरामाची सजविलेल्या रथातून नगर प्रदक्षिणा होते. आज (बुधवारी) सकाळी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते रथाचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्‍वजितराजे नाईक निंबाळकर, सभापती सौ. प्रतिभाताई धुमाळ, प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार हनुमंत पाटील, निवासी नायब तहसीलदार आर.सी.पाटील यांच्यासह राजघराण्यातील मंडळी, मानकरी, भाविक भक्त, मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर प्रभू श्रीराम, सीतामातेच्या मूर्ती रथामध्ये ठेवून त्यांची विधीवत पूजा व आरती करण्यात आली. फळे, फुले, पाने आणि विविधरंगी निशाणे लावून उसाच्या मोळ्या बांधून सजविलेला हा रथ नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला. त्यावेळी श्रीराम मंदिरापासून नगरप्रदक्षिणेसाठी निघालेल्या या रथाचे शिंपी गल्लीतून बारामती चौक मार्गे सिमेंट रोडने नगर परिषद कार्यालयासमोरील चौकात आगमन झाले. त्यावेळी नगर परिषद पदाधिकारी नगरसेवक व नगर परिषद अधिकरी, कर्मचार्‍यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यानंतर रथयात्रा ज्ञानेश्‍वर मंदिर, प.पू. गोविंद महाराज उपळेकर मंदिर, डेक्कन चौक, म. फुले चौक, मारवाड पेठ मार्गाने बारस्कर चौकात तेथून रंगारी महादेव मंदिरापासून बाणगंगा नदीपात्रात तेथून मलठण भागातील सद्गुरु हरीबुवा मंदिरापासून पाचबत्ती चौक, बुरुडगल्ली, छ. शिवाजी वाचनालय या मार्गाने सायंकाळी उशीरा पुन्हा श्रीराम मंदिरात रथ पोहोचला.

या दरम्यान शहरातील रथ प्रदक्षिणेच्या मार्गावर ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने आलेल्या अबालवृध्दांनी प्रभू श्रीरामाचे शहरात ठिकठिकाणी मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेतले. शहरवासीयांनी रथमार्गावर रांगोळ्या घालून प्रभू श्रीरामाचे स्वागत केले. ठिकठिकाणी थांबून शहरवासीय व ग्रामीण भागातील आणि परगावच्या भक्तमंडळींनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. या रथोत्सवासाठी बारामती, इंदापूर, पुरंदर, खंडाळा, माण, खटाव, कोरेगाव या तालुक्यातूनही भाविक मोठ्या संख्येने आले होते. नोकरी व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई व अन्य शहरात असलेले येथील रहिवाशीही आपल्या कुटुंबियांसह रथयात्रेसाठी आणि प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी आले होते.
 
रामरथोत्सवाच्या निमित्ताने येथे जवळपास 8/10 दिवस मोठी यात्रा भरते त्यामध्ये मेवा मिठाईची दुकाने, लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने, स्त्रीयांच्या विविध आभुषणे, बांगड्या यांच्या दुकानांचीही यात्रेत रेलचेल असते. संसार उपयोगी साहित्य, कपडे वगैरेंची दुकाने मोठ्या प्रमाणात सजलेली असतात. विविध प्रकारची करमणूकीची साधने व खेळ, उंच पाळणे, फिरती चक्रे आदी मनोरंजनाची व लहान मुलांचे आकर्षण ठरणारी साधनेही या यात्रेत दाखल झाली आहेत.

फलटण-शिंगणापूर रस्त्यावर उभारण्यात आलेल्या प्रशस्त श्रीमंत रामराजे मार्केट समोरील प्रशस्त जागेत दुतर्फा तसेच महावीर स्तंभापासून उमाजी नाईक चौक ते गजानन चौकापर्यंतच्या मार्गावर विविध प्रकारच्या वस्तूूंचे स्टॉल लागले आहेत.
 
दरम्यान यात्रेनिमित्त उद्या गुरुवार दि. 28 रोजी घडसोली मैदान येथे कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होणार्‍या मल्लांना 100 रुपयापासून 5000 रुपयांपर्यंत बक्षीसे दिली जाणार आहेत. नगर परिषद कुस्ती समितीच्यावतीने कुस्तीच्या आखाड्याचे नियोजन करण्यात येत आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे आणि शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरिक्षक प्रताप पोमण यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम रथोत्सवानिमित्त चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावर्षी प्रथमच प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी यात्रेपूर्वी विशेष बैठक बोलावुन यात्रा नियोजनाची माहिती घेतली व संबंधीत विभागांना स्वच्छता, आरोग्य, सुरक्षितता याविषयी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीस तहसीलदार हनुमंत पाटील, नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरिक्षक प्रताप पोमण, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता नामदे वगैरे अधिकारी आणि नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्टचे यादव उपस्थित होते.