Your Own Digital Platform

प्रत्येक गाव संविधान साक्षर व्हावे: मांडके

स्थैर्य, सातारा : विजय मांडके आणि तुषार बोकेफोडे यांना संविधानाची प्रत विशाल कांबळे व इतर मान्यवर.

स्थैर्य, सातारा : या देशातील प्रत्येक गाव संविधान साक्षर झाले पाहिजे. संविधानाचे महत्त्व सगळ्यांना सांगणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विजय मांडके यांनी भिमनगर येथे बोलताना केले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात संविधान साक्षर ग्राम ही संकल्पना राबवली जात असताना सातारा जिल्ह्यातील भिमनगर (शिवथर) या गावामध्ये आयोजित केलेल्या प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून विजय मांडके बोलत होते.
विजय मांडके यांनी विचारस्वातंत्र्य , उपासना स्वातंत्र्य , अभिव्यक्ती स्वातंत्र्य , धार्मिक स्वातंत्र्य , या सप्त स्वातंत्र्याचा उल्लेख करून न्याय , समता ,बंधुता , स्त्रीला समान दर्जा , समाजातील मागास घटकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी तर राज्यघटना महत्वाची भूमिका बजावते असे सांगुन ते पुढे म्हणाले की या देशातील प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानातील मूलभूत तत्वे अंगीकारता आली पाहिजेत व कर्तव्य आणि जबाबदारी याची जाण आणि भान निर्माण झाले पाहिजे ..

समता दुत विशाल कांबळे  यांनी प्रास्ताविक केले. .

याप्रसंगी बार्टीच्यावतीने भारतीय संविधानाची प्रत विजय मांडके व दिग्दर्शक तुषार बोकफोडे यांना समतादूत विशाल कांबळे हस्ते प्रदान करण्यात आली.  तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना संदीप यादव यांच्या हस्ते समता विचार जोपासणारया पुस्तकांचे वितरण करण्यात आले. भीमनगरचे  सरपंच सुरेश कांबळे यांनी स्वागत केले. चंद्रकांत कांबळे यांनी या कार्यक्रमाला ग्रामस्थांचे संपूर्ण सहकार्य असेल असे आश्वासन दिले. उपसरपंच मनीषा लोखंडे  व  ग्रामस्थ उपस्थित होते.
      
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समतादुत  राहुल गंगावणे यांनी केले