Your Own Digital Platform

शेतकरी व कामगारांचे देणे द्या; मगच कारखाना सुरु करा

स्थैर्य, फलटण : प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांना निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

‘स्वाभिमानी’चा इशारा; दत्त इंडियाच्या भूलथापांना बळी न पडण्याचे शेतकर्‍यांना आवाहन

स्थैर्य, फलटण : न्यू फलटण शुगर वर्क्स लिमिटेड साखरवाडी हा साखर कारखाना दत्त इंडिया प्रा.लि; ने चालविण्यास घेतल्याचा दावा केला असला तरी जोपर्यंत सर्व उत्पादक शेतकर्‍यांचे आणि कामगारांचे थकित बिल एकरकमी मिळत नाही. तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना हा कारखाना चालू होऊ देणार नाही असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांना चर्चेअंती देण्यात आले. ऊस उत्पादकांनी दत्त इंडियाच्या भूलथापाना बळी पडू नये, असेही स्वाभिमानीच्यावतीने सांगण्यात आले.
 
ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे थकीत देणे प्रलंबित पडल्याने गेल्या एक वर्षापासून न्यू फलटण शुगर लिमिटेड साखरवाडी कारखाना बंद आहे. या कारखान्याच्या ऊसबिलासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उच्च न्यायालयातही केसेस दाखल केलेले आहेत. सर्व उस उत्पादकांची थकीत देणे त्वरित मिळावी यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
 
यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील व सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी बंद पडलेला न्यू फलटण शुगर वर्क्स कारखाना दत्त इंडिया शुगर वर्क्स प्रा.लि; या कारखान्याने घेतल्याचे ऐकण्यात येत असले तरी जोपर्यंत सर्व ऊस उत्पादकांची थकीत बिले पूर्णपणे दिली जात नाही. कामगारांची देणी दिली जात नाही तोपर्यंत कारखाना आम्ही चालू होऊ देणार नाही. दत्त इंडिया ऊस उत्पादकांचे पंचवीस कोटी रुपयांपैकी दहा कोटी देणार असल्याचे व पंधरा कोटी रुपये शेअर्समध्ये वर्ग करणार असल्याचे सांगून ऊस उत्पादकांची फसवणूक करत आहे. जर सर्व देणी देणार असाल तरच कारखान्यात पाय ठेवावा अन्यथा कारखाना कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस उत्पादकांच्या मदतीने चालू करू देणार नाही याबाबत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्व जबाबदारी प्रशासनावर असेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देऊन दत्त इंडियाने साखरवाडी कारखाना घेताना काय करार केलाय हे सखोलपणे जनतेपुढे मांडावे, असे आवाहनही राजेंद्र ढवण पाटील आणि धनंजय महामुलकर यांनी केले आहे.

यावेळी निवेदन देताना स्वाभिमानीचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर रवींद्र घाडगे, तालुकाध्यक्ष नितीन यादव, शहराध्यक्ष सचिन खांनविलकर, प्रमोद गाडे सुभाष जाधव, दादासो जाधव, रवींद्र भोसले , विश्वनाथ यादव आदी उपस्थित होते.

आत्ता पर्यंत न्यू फलटण ने पैसे दिले नाहीत म्हणून तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या ही दुर्दैवी बाब असून आता दत्त इंडियानेही शेतकर्‍यांनाच मारायचे ठरवले असून 25 कोटी देणार म्हटले आहे. परंतु त्यातील 15 कोटी हे शेअर जमा करण्यात येणार आहेत ही शुद्ध फसवणुक असल्याचे निदर्शनास आणून देत आता या संबंधी जी बोलणी होतील ती पत्रकारां समक्षच होतील असे पुणे जिल्हा अध्यक्ष ढवाण पाटील यांनी स्पष्ट केले.