Your Own Digital Platform

चारा छावण्यांची बिले शासनाकडे अडकून


स्थैर्य, सातारा : परतीच्या व अवकाळी पावसाने माण तालुक्यात हाहाकार माजवला, दुष्काळी परिस्थितीमध्ये चाया अभावी गावा गावात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. चारा छावण्यांवर शासनाने आतापर्यंत 17 कोटी 27 लाख 96 हजार 896 रुपयांचा निधी जून अखेर खर्ची टाकला आहे. मात्र पाऊस पडल्याने चारा छावण्या बंद पडल्या परंतु छावणी चालकांचे आजही कोटयवधी रुपयांची बिले शासनाकडे अडकून पडली आहेत, रखडलेली बिले निघत नसल्याने छावणी चालक प्रांत कार्यालयाचे उंभरटे झिजवत आहेत. जो पर्यंत सरकार सत्तेत येत नाही तो पर्यंत रखडलेली बिले निघणार नसल्याची धूसर चिन्ह निर्माण झाली आहेत.

पशुधन वाचविण्याच्या अनुषंघाने शासनाने गावा गावात चारा छावण्या सुरू करण्याचा धाडशी निर्णय घेतला होता. सुरुवातीच्या काळात चारा छावण्या सुरू करण्यासाठी छावणी चालकांच्या शासन दरबारी उडयावर उडया पडल्या, शासनानेही मागेल त्याला छावणी मंजूर करून दिली, काही गावात दोन दोन तीन तीन छावण्या सुरू झाल्या या शासनाच्या निर्णयामुळे एक प्रकारे छावणी चालकांची असलेली मक्तेदारी मोडीत निघाली परीणामी शेतकरी पशुपालक छावणीवर सुखी समाधानी राहिला. शासनाचे एवढे निकष होते. या निकषांच्या तावडीतून छावणी चालक सुटले नाहीत, त्यामुळे पशुपालकांना वेळेवर चारा पाणी मिळाले आरोग्याच्या सुविधा प्राप्त झाल्या.जून अखेर चारा पाणी व यावर शासनाचा 17 कोटी 27 लाख 96 हजार 896 रुपये खर्च झाला आहे. तसेच मोठया जनावरांबरोबर प्रबोधनकार ठाकरे सूतगिरणी यांच्या माध्यमातून शेळ्या मेंढयांची पिंगळी येथे राज्यातील पहिली चारा छावणी सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत चारा छावण्यांवर कोटयवधींचा खर्च झाला असून आणखी कोटयवधी रुपयांची देणी देणे बाकी आहे. शासनाने लावलेल्या निकषांची काटेकोर पणे तपासणी केल्यास अनेक छावणी चालकांना येणे बाकीवर पाणी सोडावे लागणार आहे. काही छावणी चालकांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून छावण्या चालवल्या आहेत जुनी सीसीटीव्ही फुटेज पाहून बिले काढली तर अनेकांची पंचायत होईल प्रसंगी शासनाला छावणी चालक देणे लागतील अशीही काही ठिकाणी परिस्थिती निर्माण होईल. विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकी मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सरकार स्थापणेस विलंब होत असतान त्याचा फटका छावणी चालकांना बसला आहे. छावणी चालकांची प्रलंबीत बिले शासन देत नसून बिले काढण्यासाठी प्रांत कार्यालयात नित्य नियमाने समूहाने येरजाया घालण्याचे काम सुरू आहे. बिले हातात आली नसल्याने अनेक चारा मालक, चारा वाहतूकदार, कामगार, पाणी पुरवठा करणारे टँकर मालकांची बिले थकली आहेत ती वसूल करण्यासाठी अनेक जण छावणी चालकांच्या दारात मोकळे हेलपाटे मारत आहेत. कुठून बुद्धी सुचली अन छावणी चालवायला घेतली अशा तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.