Your Own Digital Platform

वंचित बहुजन आघाडीचे निवेदन


स्थैर्य, सातारा : शासनाने तोकडी मदत देवून शेतकर्यांची क्रूर थट्टा केली आहे. तसेच जेएनयूच्या शैक्षणिक शुल्कातही वाढ केली आहे. त्यामुळे शासनाने सरसकट पंचनामे करावेत आणि शैक्षणिक फी वाढ रद्द करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहूजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.
 
याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये महागाईचा आगडोंब उसळला असल्याने सर्वसामान्य जनता आणि शेतकरी व शेतमजूर हवालदील झाला आहे. त्यातच निसर्गानेही शेतकर्यांवर अवकृपा केली आहे. अतिवृष्टी आणि अवेळी पाऊस यामुळे ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके पूर्णपणे नुकसानीत गेली आहेत. नवीन पिकांची पेरणी होवू शकली नाही. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला असून पुन्हा आत्महत्येची आकडेवारी वाढते की काय अशी भीती निर्माण होत आहे. यासाठी शासनाने सरसकट शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करून तत्काळ शेतकर्यांच्या खात्यावर जमा व्हावी, अशी मागणीही वंचित बहूजन आघाडीच्या वतीने करण्यात आली होती. परंतु, सध्या जी मदत जाहीर केलेली आहे ती अत्यंत तोकडी व शेतकर्यांची क्रुर थट्टा करणारी आहे. सध्याचा महागाईचा निर्देशांक पाहता कोणते निकष जावून ही भरपाई जाहीर करण्यात याली, याबाबत जनतेमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. या बाबींचा विचार करून नव्याने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.