Your Own Digital Platform

महाराष्ट्राच्या निवडणुकीतील एक दंतकथा!


निमित्त...


सभा ऐकायला येणारा माणूस स्तिमित होऊन जाई. अरे ह्यांना आपल्या तालुक्याबद्दल इतकं काही माहीत आहे, आमचे नेते माहिती आहेत, हा धक्का बसून मुलं खुश व्हायची. ‘हा आपला माणूस आहे’ अशी आपुलकी त्यातून वाढत जायची.
 
पवार हे करू शकले, कारण तसे ते घडत गेले. 1962ला ते पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संपर्कात आले. चव्हाणसाहेब हे या मातीतलं अनमोल, अजोड रत्न. आणि त्याच वेळी रत्नपारखी पण. हा मुलगा मेहनती आहे, हुशार आहे, स्वतंत्र आणि आधुनिक विचारांचा आहे, हे त्यांनी हेरलं. ताकद दिली. 1967ला पवारांच्या वयाच्या 27 व्या वर्षी चव्हाण साहेबांनी भल्या भल्यांचा विरोध डावलून पवारांना विधानसभेचं तिकीट दिलं. 1967 ते 1972 या पाच वर्षांत, सभागृहात निव्वळ आमदार म्हणून बसवलं. हा काय प्रश्न विचारतो, भाषणं कशी करतो, मतदारसंघात काम कसं आहे, याची चव्हाणसाहेब माहिती घेत. वेळोवेळी सूचना करत. 1972ला देशात इंदिरा लाट होती. महाराष्ट्रात काँग्रेसच्या 222 जागा आल्या. मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी पवारांना राज्यमंत्री करायचं ठरवलं. चव्हाणसाहेबांना पवारांनी आणखी काही काळ फक्त आमदार म्हणून काम करावं असं वाटे. त्यांनी वसंतराव नाईकांना तसं सांगितलं. पण नाईकसाहेब म्हणाले, चव्हाणसाहेब, शरद मेहनती आहे. समजूतदार आहे. या पिढीच्या हाती सूत्रं देण्याचा काळ आलाय. तिला संधी द्यायला हवी. बाकी सगळं ऐकेन पण शरदला मंत्री करू नको हे तुमचं म्हणणं मी ऐकणार नाही. तो मंत्री होईलच आणि त्याच वेळी तो गृहराज्यमंत्री होईल!
 
पहिल्याच फटक्यात गृहराज्यमंत्री! वसंतराव स्वतः गृहमंत्री. प्रशासनाचा प्रचंड अनुभव असलेला माणूस! वरून परत चव्हाणसाहेबांची आपल्या कामावर असलेली सूक्ष्म नजर!! पवारांनी या संधीचं सोनं केलं. राज्य कसं चालतं हे नीट समजून घेतलं. पूर्णवेळ विधिमंडळात बसत. महत्त्वाच्या चर्चा ऐकत. बैठक पक्की होत गेली. आणि संधी येताच 1978ला, आपल्या वयाच्या केवळ 38 व्या वर्षी पवार मुख्यमंत्री झाले!! 

पण हे होत असताना त्यांना एका मोठया आरोपाला सामोरं जावं लागलं. वसंतदादा पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं सरकार पवारांनी पाडलं होतं. ‘शरदने पाठीत खंजीर खुपसला’ हे वाक्य आजही पवारांना टोचतं. आयुष्यभर पुरलेला हा घाव आहे. सरकार वसंतदादांचं पडलं, पण जखम शरद पवारांना झाली जी आजही पूर्ण भरलेली नाही!! 

तिथून मात्र पवारांनी आपलं प्रशासकीय कौशल्य सिद्ध केलं. निर्णय घेतले. राबवले. प्रसंगी त्यासाठी स्वतःच्या पक्षात संघर्ष केला. मुलींना वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळणार हा असाच एक निर्णय. काळाच्या खूप पुढे जाऊन घेतलेला. साहजिकच सरंजामी काँग्रेस पक्षात विरोध झाला. शरद पवार विरुद्ध इतर सगळा पक्ष असं चित्र होतं. पण पवार डगमगले नाहीत. त्याचं कारण विचारांवर पक्की श्रद्धा. हा विचार समतेचा, पुरोगामीत्वाचा!

अनेकांच्या हे लक्षात येत नाही की, शरद पवारांना जो वारसा मिळाला तो फक्त यशवंतराव चव्हाणसाहेबांचाच नाही. चव्हाणसाहेब हा महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचा एक सोन्याचा माईलस्टोन आहेत. फुले, शाहू, आंबेडकर ही परंपरा महाराष्ट्राला आधुनिक विचारांनी समृद्ध बनवणारी परंपरा आहे. ज्या पट्ट्यात म्हणजे आजच्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या पट्ट्यात या विचारांचा आणि चळवळीचा जोर होता, तिथेच 2019ला शरद पवारांचे बहुतांश आमदार निवडून आलेत! हे राजकारण असं इतिहासाच्या एका भरभक्कम परंपरेचं राजकारण आहे!!
 
मधल्या काळात पवारांच्या चुका पण अनेक झाल्या. ज्यांना साखर कारखाने, सूत गिरण्या, कॉलेजेस आणि दूध डेअर्‍या यांच्यापलीकडे काहीही दिसत नाही असे टोळीसम्राट पवारांनी सांभाळले. त्यांच्या अनेक चुकांकडे दुर्लक्ष केलं. हे फक्त सत्तेचे दास. विचारांशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. ही धूडं पवारांनी खूप काळ सांभाळली. त्यांची ही खूपच मोठी चूक. त्या चुकीची शिक्षाही त्यांना जनतेने दिली. सतत दोन लोकसभा निवडणुकांत सपशेल पराभव केला. अखेर सत्तेचे लोभी परत सत्तेकडे वळले, भाजपमध्ये गेले आणि पवारांची या संकटातून सुटका झाली. 

असं नाही की सगळेच गेले. काही अजूनही आहेत. आता सत्ता येण्याची चिन्हं दिसताच आणखी काही परतीच्या वाटेवर पण आहेत. पवारांनी हे लक्षात घ्यायला हवं की, आज जी तुमची क्रेझ आहे, अपील आहे, ते या लोकांनी सोडून गेल्यावर निर्माण झालेलं आहे. ही ब्याद परत पदरात घेणं म्हणजे केल्या श्रमावर पाणी ओतणं!
 
‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ ही आता शरद पवारांची जबाबदारी आहे. 

या दोन गोष्टी येत्या काळात बदलल्याच पाहिजेत. आता शिवसेनेसोबत एक राजकीय तडजोड होऊ घातलेली आहे. राजकारणात काही तात्कालिक गरजेतून तडजोडी कराव्या लागतात. याक्षणी महाराष्ट्र शरद पवारांसोबत आहे. आणि ही शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस अशी तडजोड व्हावी ही महाराष्ट्राची इच्छा आहे. पवारांच्या चाणाक्ष मनाने ही इच्छा ओळखलीय आणि म्हणूनच बात इतनी दूर गयी है. 

या सगळ्या तडजोडीचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे. महाराष्ट्र हा निव्वळ भौगोलिक प्रदेश नाही. तर वेळोवेळी आपली जबाबदारी ओळखून देशाच्या हितासाठी सर्वात पुढे उभा राहणारा आणि परिवर्तनाचा विचार कृतीतून देणारा हा प्रदेश आहे. हा या भूमीचा इतिहास जसा आहे, तशी ती जबाबदारी, कर्तव्यसुद्धा आहे.
 
मुजोरांच्या विरोधात सर्वस्व पणाला लावून उभं राहण्याची जोखीम उचलणं आणि इतरांना त्यासाठी प्रेरणा देणं हे काम महाराष्ट्र काल आज नाही, तर या पेशावर ते चित्तगाव आणि इटानगर ते सोमनाथपर्यंत पसरलेल्या भूमीवर मागची तब्बल दोन हजार वर्षं करत आलाय. आज पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र येऊन तेच करायची वेळ आलीय. शरद पवार या सगळ्या घडामोडींचे कर्ते करविते आहेत. आज संपूर्ण देशात ज्या क्षमतेने पवार उभे राहिलेत आणि ज्या तडफेनं त्यांनी लढावं कसं हे दाखवून दिलंय त्याचं कौतुक आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचं हे राजकारण जमलं पाहिजे, वाढलं आणि बहरलं पाहिजे. ती या देशाची आता सर्वात महत्त्वाची गरज आहे!!
 
देशाच्या गरजेला धावून जाणं हाच महाराष्ट्र धर्म आहे! याक्षणी शरद पवार ही या महाराष्ट्र धर्माची आयडेंटिटी आहेत!!!

(लेखक अमेय तिरोडकर राजकीय पत्रकार आहेत.) 

ameytirodkargmail.com TWITER – ameytirodkar