Your Own Digital Platform

तत्त्वज्ञान ‘शहाणपणाचे शास्त्र’


निमित्त...

नुकताच दिनांक 21 नोव्हेंबर 2019 रोजी जागतिक तत्त्वज्ञान दिवस संपूर्ण जगभर साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने...
 
महान ग्रीक तत्त्ववेत्ता सॉक्रेटिसच्या स्मरणार्थ ‘जागतिक तत्त्वज्ञान दिवस’ गेली काही वर्षे नोव्हेंबरच्या तिसर्‍या गुरुवारी जगभर साजरा केला जातो. तिसरा गुरुवार यावर्षी 21 नोव्हेंबर रोजी येतो. अडीच हजार वर्षापूर्वी इ.स.पू. 470 मध्ये सॉक्रेटिसचा जन्म ग्रीसमधील सर्वच प्राचीन परंपरांचे केंद्र असलेल्या अथेन्स या राजधानीच्या शहरात एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक शिल्पकार होते तर आई सुईण होती. आपल्याला हवा तो भाग ठेवून, नको तो काढून दगडाला आकार देण्याची शिल्पकाराची कला आणि आईच्या उदरातून नव्या जीवाला नव्या जगात सहिसलामत बाहेर यायला व आईच्याही प्रसूति वेदना कमी करायला मदत करणारी त्यांची सुईण आई. या उभयतांच्या जिवंत संस्कारातून माणसाला आकार देणारा सॉक्रेटिस स्वतःही घडला. ‘सत्य हेच जीवनाचे सार आणि सद्गुण म्हणजेच ज्ञान’ हे आचरणाचे महान सूत्र त्यांनी अवघ्या जगाला दिले. सत्यासाठीच त्यांनी अथेन्समधील तत्कालीन राजकीय-सामाजिक व्यवस्थेविरुद्ध आवाज उठविला. लोकांना विशेषतः तरुणांना आपल्याविरुद्ध तो भडकवतो हा आरोप ठेवून तेथील राज्य व्यवस्थेने हेमलॉक नावाचे विष देऊन सॉक्रेटिसला देहांताची शिक्षा ठोठावली. ती त्यांनी धीरोदात्तपणे हसतमुखाने स्वीकारली. ज्याला जन्म आणि मृत्यु ही अस्तित्वाची दोन रुपे हे कळते त्याला मृत्युचे भय नसते. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाचे हे फलीत आहे.
 
20 व्या शतकातील विख्यात तत्त्वचिंतक बर्ट्रांड रसेल यांच्या मते आजच्या प्रगत माणसापुढे प्रमुख दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, निसर्गाला समजून घेवून त्यावर प्रभुत्व गाजविणे कसे शक्य होईल? याचे उत्तर विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठी कार्य करीत असते असे ते देतात. तर दुसरा प्रश्न विज्ञानाने मिळालेल्या निसर्ग ज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा? यासाठी मात्र तत्त्वज्ञान कार्य करु शकते असे ते सांगतात. आईनस्टाईन यांनी उर्जाविषयक ए = चउ2 असे सूत्र दिले त्याचा वापर करुन अमेरिकेने अणुबाँब तयार केला आणि दुसर्‍या महायुद्धात त्याचा वापर करुन जपानची हिरोशिमा व नागासाकी ही शहरे उध्वस्त केली. विज्ञान आणि तंत्रज्ञान असे अर्धवट ठरते. ते खरोखरच मानवी हिताचे ठरण्यासाठी व पूर्णत्वाला जाण्यासाठी त्याला तत्त्वज्ञानाची सोबत हवी. तत्त्वज्ञान हे मार्गदर्शक म्हणून किंवा विवेकाच्या माध्यमातून त्याला दिशा देत असते. तत्त्वज्ञानाला इंग्रजीत फिलॉसॉफी म्हटले जाते. या संज्ञेचा अर्थ र्ङेींश ेष ुळीशवेा ‘शहाणपणावरील प्रेम’ ज्ञानावरील प्रेम असा होतो. जेथे शहाणपण आहे, विवेक आहे, ज्ञान आहे तेथे मानवी हित, कल्याण निश्चित आहे. या दृष्टीने विज्ञानाला ते सोबत्याची साथ देत असते.
 
दुसर्‍या महायुद्धानंतर रसेल यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधीची हीच भूमिका घेतली. माणसाला विज्ञान हवे त्याचबरोबर तत्त्वज्ञानही हवे आहे. एकाने ऐहिक जीवन समृद्ध होते तर दुसर्‍याने माणसाचे आत्मिक जीवन पर्यायाने माणूसपण आकाराला येते. आपले निरीक्षण केले तर या दोन्ही गोष्टींची आपल्याला ‘माणूस’ म्हणून आवश्यकता आहे. आणखी सांगायचे तर एक शास्त्र म्हणजे ‘शस्त्र’ आहे. तर दुसरे ‘शस्त्रधारी’ आहे. शस्त्रधारी ठीक तर शस्त्रही ठीकच राहील. अन्यथा माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखे होईल. यादृष्टीने माणसाचा ‘माणूसपणा’ जागवणारे शास्त्र म्हणून तत्त्वज्ञानाचे महत्व अधोरेखीत होते.
 
एवढेच नाहीतर आज ज्या विविध ज्ञानशाखा आपल्या जीवनात दिसतात. त्यांचा उदय तत्त्वज्ञानाच्या कुशीतूनच झाला आहे म्हणून तर ‘सर्व शास्त्रांची जननी’ म्हणून त्याकडे पाहिले जाते. तत्त्वज्ञान म्हणजे तत्त्वासंबंधीचे ज्ञान तत् म्हणजे ‘ते’ जे काही या विश्वात आहे ते सर्व, तर या तत् चा ‘तत्पणा’ म्हणजे तत्त्व होत. आपल्या भोवताली जे काही आहे ते अधांतरी असणार नाही त्याला कशाचेतरी अधिष्ठान हवेच ते अधिष्ठान म्हणजे तत्त्व होय. त्याचे ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान. ज्याप्रमाणे सगळी माणसे परस्परांपासून बाह्यतः भिन्न असूनही त्यांच्याकडे आपण एक माणूस म्हणूनच पाहतो त्याचे कारण त्यांच्यात असलेले मनुष्यत्व किंवा माणूसपण. हे माणूसपण हेच ‘तत्त्व’ होय त्याचे ज्ञान ते तत्त्वज्ञान होय. याच आधारावर आपण सर्व माणसातील समानता दाखवितो. हे तत्त्वज्ञानाचे महत्तम असे कार्य आहे. त्यामुळे त्याचे परिशीलन कोणत्याही काळात उपयोगाचे ठरते. तत्त्वज्ञान म्हणजे ज्या विश्वात आपण राहतो ते आणि आपण या विषयीचा दृष्टिकोन. त्या दृष्टीने पाहिल्यास तत्त्वज्ञान म्हणजे जगाकडे/विश्वाकडे पहाण्याचे विविध दृष्टिकोन होत. उदा. अस्तित्ववाद, बुद्धिवाद, जीवनवाद, अनुभववाद इ. यांचा अभ्यास करण्याने माणूस-व्यक्ती बौद्धिक, वैचारिक दृष्ट्या अधिक प्रगल्भ होते. ज्याप्रमाणे समुद्र मंथनातून ‘अमृत’ निघते त्याचप्रमाणे विविध विचारप्रवाहांच्या अभ्यासाने-मननाने व्यक्तीचे ‘माणूसपण’ उजळून निघते. त्यातून ‘शहाणपण’ हे सर्वोच्च मानवी मूल्य उदयाला येते. हे तत्त्वज्ञानाचे फार मोठे आणि जगाच्या हिताचे कार्य आहे. समजा तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने हे झालेच नाही तरी तो मनुष्य किमान विचारप्रवृत्त तरी होईल आणि ‘विचार’ हेच माणसाचे लक्षण आहे. माणूस विचारप्रवृत्त व्हावा हीच तत्त्वज्ञानाची खरी अट आणि भूमिका आहे. कारण विचारप्रवृत्त मनुष्य कधीही केव्हाही घातकी नसतो, म्हणूनच रसेल म्हणतात, माणसाकडे चिमूटभर, थोडे जरी तत्त्वज्ञान असलेतरी त्याच्यात दुसर्‍या विषयीचा आपपरभाव, रागद्वेष राहणार नाही. पर्यायाने त्याच्यात युद्धवृत्ती, रक्तपिपासूवृत्ती दिसणार नाही. यालाच आपण बुद्धवृत्ती म्हणू शकतो. म्हणूनच तर जगाला युद्ध नको बुद्ध हवेत असे म्हटले जाते. एकंदर वरील विवेचनांती असे म्हणता येईल की, मानवी जीवनाचे आणि तत्त्वज्ञानाचे ध्येय अगदी अध्यात्मिक अंगानेच नव्हे तर उत्क्रांती तत्त्वानूसारही सर्व जीवमात्रांना कवेत घेणार्‍या जाणिवेचे उन्नयन हेच आहे. या जाणिवेला वैश्विक जाणिव म्हणता येईल. या जाणिवेचा ध्यास म्हणजे संतत्वाचा-बुद्धत्वाचा ध्यास होय. जागतिक तत्त्वज्ञान दिवस साजरा करण्यामागे हाच मूळ हेतू आहे.
 
- प्रा.नवनाथ रासकर, मुधोजी महाविद्यालय, फलटण.