Your Own Digital Platform

शिवतीर्थावरील शपथविधी कार्यक्रमात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार


शांतता क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या दादरच्या ऐतिहासिक शिवतीर्थावर गुरुवारी होणार्‍या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाची शपथविधी सोहळा कार्यक्रमावर भाष्य करण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. मात्र अशा कार्यक्रमांच्यावेळी सुरक्षेची चिंता न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने व्यक्त केली. सुरक्षेची दखल घ्या असे स्पष्ट करतानाच अशा प्रकारचे कार्यक्रम होण्याची प्रथा पडू नये असे मतही व्यक्त केले.
 
उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणा संदर्भातील याचिकांवर निर्णय देताना शांतता क्षेत्रात लाऊडस्पिकरला बंदी घातली आहे, या बंदी नंतरही या मैदानावर होणार्‍या कार्यक्रमांना लाऊडस्पिकरचा वापर केला जात असल्याचा आरोप करून विकॉम ट्रस्टने 2010 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
 
ही याचिका आजही प्रलंबित आहे. 6 डिसेबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमच्या पाशर्वभूमीवर या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांनी शांता क्षेत्र असूनही पोलीस खात्याकडून नियमितपणे लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी देतात आणि कार्यक्रम संयोजकांकडून ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन झाल्यास कोणतीही प्रभावी कारवाई केली जात नाही असा आरोप केला. यावेळी गुरुवारी शिवाजी मैदानावर होणार्‍या शपथविधी कायर्र्क्रमावर आम्हाला काही भाष्य करायचे नाही. आम्ही फक्त काही अनुचित प्रकार घडू नये अशी प्रार्थना करतो. आम्हाला सुरक्षेची चिंता वाटते ती चोख करा असे मत न्यायलयाने व्यक्त केले.
 
तसेच 6 डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणार्‍या कार्यक्रमासाठी पालिकेमार्फत काय खबरदारी घेतली जाते व इतर कार्यक्रमावेळीही पालिकेचे कशा प्रकारे नियोजन असते त्याबाबत प्रतिज्ञापत्रावर माहिती देण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले व सुनावणी 12 डिसेंबर पर्यंत तहकूब केली.