Your Own Digital Platform

बायोमेट्रिक सर्व्हे झाल्याशिवाय हटणार नाही


हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम यांचा इशारा

स्थैर्य, सातारा : पोवई नाका ते हुतात्मा चौक रस्त्यांची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली . त्या पाश्र्वभूमीवर हॉकर्स संघटनेने पालिकेचा बायोमेट्रिक सर्वे झाल्याशिवाय हॉकर्स आपल्या जागा सोडणार नाहीत असा इशारा हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम यांनी आयोजित बैठकीदरम्यान दिला.

 सोमवारी सकाळी अकरा वाजता सातारा बस स्थानक मार्गावर व्यवसाय करणार्‍या हॉकर्सची पोवई नाका मंडईसमोरील गाळ्यात बैठक झाली . जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला शंभर हॉकर्स उपस्थित होते . निकम म्हणाले, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हॉकर्सचा बायोमेट्रिक सर्वे करूनच फेरीवाला समितीच्या माध्यमातून हॉकर्स झोन उपलब्ध करावयाचे आहेत . मात्र पालिकेचा बायोमेट्रिक सर्वे अद्याप पूर्ण झालेला नाही राजवाडा ते पोवई नाका या दरम्यानच्या विक्रेत्यांची नोंदणी सुरू आहे . मात्र पोवई नाका ते हुतात्मा चौक या दरम्यानच्या विक्रेत्यांचा बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात आले नसल्याने त्यांच्या नोंदी रखडून पडल्या आहेत . असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने हॉकर्सचे म्हणणे ऐकून न घेता हुतात्मा चौक ते पोवई नाका या दरम्यानची खोकी हटवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत . जोपर्यंत सातारा पालिकेचा बायोमेट्रिक सर्वे पूर्ण होत नाही तोपर्यंत हॉकर्स पदपथावरून हटणार नाही असा इशारा निकम यांनी दिला आहे.

सातारा पालिकेच्या शहर विकास विभागाकडे एकूण540 विक्रेत्यांची नोंद आहे . मात्र लक्ष्मणराव निकम यांनी 640 विक्रेते असल्याचा संदर्भ दिला . तब्बल शंभर विक्रेत्यांची नोंद झालेली नाही पालिकेकडे या विक्रेत्यांची कोणतीही कागदपत्रे नाही .पंचायत समिती मार्ग व तहसीलदार कार्यालय पिछाडी येथे दोन हॉकर्स झोन विकसित करण्यात आलेले असूनही विक्रेते अद्याप तिकडे गेलेले नाहीत . हाच खरा येथे वादाचा मुद्दा आहे . त्यामुळे सातारा बस स्थानक मार्गावरील होऊ घातलेली अतिक्रमण हटाव मोहिम अडचणीत येण्याची शक्यता आहे .