Your Own Digital Platform

सई मांजरेकर यांच्या हस्ते श्री गाडगे महाराज आश्रम शाळेत सोलर ऊर्जा संचाचे उद्घाटन

स्थैर्य, फलटण : अभिनेत्री सई मांजरेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शमीरा यांचे हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून या सोलर ऊर्जा संचाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर आयोजित सभेस उपस्थित मान्यवर.

स्थैर्य, फलटण : श्री गाडगे महाराज मिशन मुंबई संचलित श्री गाडगे महाराज आश्रम शाळा, ताथवडा ता. फलटण येथे सलमान खान अँव्हेन्चर लि. मुंबई यांनी आश्रम शाळेतील मुलांना सोलर प्लँट द्वारे 24 तास गरम पाणी उपलब्ध करुन दिले असून या संचाचा उदघाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रख्यात अभिनेत्री सई मांजरेकर (अभिनेत्री दबंग 3 ), सलमान खान अँव्हेन्चरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शमीरा विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या, अध्यक्षस्थानी संत गाडगे महाराज मिशन, मुंबईचे चेअरमन मधुसूदन मोहिते पाटील होते. यावेळी गाडगे महाराज मिशनचे खजिनदार चंद्रकांत माने, येळेवाडी आश्रम शाळा संचालक महानवर, रोहित मुजुमदार, बाबा सूर्यवंशी, चंद्रकांत जेधे (कोरेगाव), ताथवड्याचे सरपंच, उपसरपंच व ताथवड्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, सर्व विध्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार आश्रम शाळेचे संचालक ह. भ. प. मारुती महाराज शिंदे यांनी केला व प्रास्तविकात आश्रम शाळेविषयी विवेचन केले.

या आश्रम शाळेत 280 विद्यार्थी/विद्यार्थिनी निवासी असून त्यांना या संचाचा चांगला उपयोग होईल, आतापर्यंत 200 लिटर क्षमतेच्या बंबाद्वारे या विध्यार्थ्यांना स्नानासाठी गरम पाणी उपलब्ध करुन दिले जात असे या सोलर ऊर्जा संचामुळे त्यांना मुबलक गरम पाण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे यावेळी ह.भ.प.मारुती महाराज शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.

या संचासाठी सुमारे 7 लाख 40 हजार रुपये खर्च आला असून त्यामुळे आश्रम शाळेतील भौतिक सुविधांमध्ये मोलाची भर पडल्याचे नमूद करीत ह.भ.प. शिंदे महाराज यांनी समाधान व्यक्त केले.

झेंडे सर यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत आणि समारोप व आभार प्रदर्शन केले, हजारे सर यांनी सूत्र संचालन केले.