Your Own Digital Platform

स्वत:च्या बचावासाठीच पवारांची धडपड


माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील यांचा घणाघाती आरोप

स्थैर्य, कोरेगाव : विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे, असे सतत ऊर बडवून सांगणारे शरद पवार हे आता शिवसेनेला घेऊन का सरकार बनवत आहेत? शरद पवार हे स्वत:ला आणि पुतण्या अजित पवार यांना वेगवेगळ्या घोटाळ्यातून वाचता यावे यासाठीच सत्तेचा वापर करू इच्छित आहेत. पवार कुटुंबीय हे सत्तेपासून बाहेर राहूच शकत नाही. त्यांच्या बोलण्याला काँग्रेस व शिवसेना कशी भुलली, हेच समजून येत नाही. महाराष्ट्रात सरकार बनविण्याची पवारांची धडपड केवळ स्वत:च्या बचावासाठीच आहे, असा घणाघाती आरोप माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील यांनी केला.
 
शालिनीताई म्हणाल्या, राज्यातील सहकारी साखर कारखानदारीचे संरक्षक म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेणारे शरद पवार हे केंद्र सरकारमध्ये अनेक वर्षे कृषिमंत्री होते. त्यांच्या मंत्रालयामार्फतच कारखानदारीबाबत निर्णय घेतले जात होते. नाबार्डमार्फत त्यांना व त्यांच्या मंत्रालयाला माहिती दिली जात होती. मात्र पवारांनी पद्धतशीरपणे ही माहिती बाजूला ठेवत चुकीच्या गोष्टींची पाठराखण केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी राज्य बँकेच्या कारभाराचा पर्दाफाश केला. सत्तेचा मोह न ठेवता, त्यांनी कठोर पावले उचलत 2011 मध्ये राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळच बरखास्त केले. हा निर्णय राष्ट्रवादीला आवडला नाही, मात्र त्यांनी शांत बसणे पसंत करत सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी पाठिंबा काढून घेत पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकार पाडले आणि राज्याला राष्ट्रपती राजवटीमध्ये ढकलले, हा इतिहास ताजाच आहे. आता पृथ्वीराज चव्हाण हेसुद्धा पवारांच्या म्हणण्याप्रमाणे राज्यात महाआघाडीचे सरकार बनवायला निघाले आहेत, याचे कोडे अजून उलगडलेले नाही. त्यांनी असा निर्णय घेऊ नये, अशी अपेक्षा डॉ. पाटील यांनी व्यक्त केली.