Your Own Digital Platform

हिंदुत्व पुरेसे नाही, नवा फॉर्म्युला शोधावा!निमित्त...
अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल आल्यानंतर काही दिवसांतच शिवसेनेने भाजपशी युती तोडली. रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात अस्तित्वात आलेली ही युती खर्‍या अर्थाने हिंदुत्वाची युती ठरली होती. अर्थात, यामध्ये दोघांचे हित होते. रथयात्रेच्या लाटेवर स्वार होत 1984 च्या पराभवाच्या धक्क्यातून भाजप सावरला आणि दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचला. अयोध्या प्रकरणानंतर मुुंबईत 1992-93 मध्ये उसळलेल्या दंगलीच्या काळात हिंदूंची रक्षक म्हणून शिवसेना नावारूपाला आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जाहीरपणे ‘बाबरी मशिदीचे पतन शिवसैनिकांनी केल्याचा मला गर्व आहे,’ असे सांगितले होते. आता या युतीचा काडीमोड झाला आहे. याचा अर्थ आक्रमक हिंदुत्वाचे राजकारण लयास चालले आहे की संधिसाधूपणा हाच राजकारणातील सर्वाधिक सफल ‘वाद’ आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी भाजपने सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदींचे व्यक्तित्व आणि त्यांचा राष्ट्रवाद, बहुसंख्याकवाद आणि कल्याणवादाच्या त्रिशुळावर स्वार होत मोठा जनाधार मिळवला. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीने लोकसभेच्या 48 पैकी 41 जागा पटकावल्या आणि विधानसभेच्या 230 जागांवर आघाडी कायम राखली. राष्ट्रीय अजेंड्यापेक्षाही स्थानिक मुद्दे अधिक प्रभावी ठरल्यामुळे युतीला विधानसभा निवडणुकीत लोकसभेची पुनरावृत्ती करता आली नाही.
 
उदाहरणार्थ, अयोध्येतील मंदिर-मशीद वादाने भाजपच्या मतदारांना प्रेरित केले, परंतु त्याचे पडसाद सामाजिक आणि प्रादेशिक स्तरावर मर्यादित आणि कालसुसंगत असेच राहिले. प्रारंभी या मुद्द्याने भाजपला 20 टक्क्यांपेक्षाही अधिकचा पक्ष बनवला, परंतु गेल्या 5 वर्षांतच परिणामकारक पक्षाच्या रूपात त्यास स्थान मिळाले. 2009 च्या निवडणुकीत भाजपला 18% मते मिळाली होती, 10 वर्षांत ही संख्या 37% वर पोहोचली. काँग्रेसचा पराभव आणि मोदींना नंबर 1 चा नेता म्हणून मिळत राहिलेली पसंती हेच मुख्य कारण होते. भाजपच्या मतांमध्ये राममंदिर किंवा 370 वे कलम, समान नागरी कायदा यामुळे वाढ झाली नाही, तर राष्ट्रीय पर्यायांकडून होणारी निराशा आणि मोदींच्या नेतृत्वामुळे लोकांच्या वाढत्या आशा हे त्यामागचे इंगित आहे.
 
मोदी युगात भाजपने विकास आणि हिंदुत्वाच्या रथातून स्वारी करण्याचा प्रयत्न केला. ज्या वादग्रस्त मुद्द्यांवर सहमती घडवण्याचा प्रयत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी केला तसा काही दबाव मोदी-अमित शहा यांना जाणवत नाही. मोदी-2 पर्वाच्या पहिल्या 6 महिन्यांत सरकारने 370 वे कलम हटवले, राममंदिर उभारणीसाठी न्यायालयाने परवानगी दिली, तीन तलाकची प्रथा फौजदारी गुन्हा ठरवला आणि समान नागरी कायद्याच्या दिशेने एक पाऊल टाकले. भगवे वस्त्र धारण करणार्‍या विभूतीला उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री बनवून भारताची मूळ हिंदू राष्ट्राची ओळख प्रभावीपणे प्रत्येक पातळीवर मुख्य प्रवाहात आणण्याचा स्पष्ट संदेश मोदी-शहा यांनी दिला आहे.
 
राष्ट्रवादाचा रथ तर चौखूर उधळत आहेे, परंतु विकास रथाची गती मंदावल्याने तो अडखळू लागला आहे. काही महिन्यांपूर्वी पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे दाखवलेले स्वप्न कोलमडणारी वृद्धी, वाढती बेरोजगारी, तणावपूर्ण बँकिंग व्यवस्था आणि गुंतवणूकदारांमधील वाढता संभ्रम, आत्मविश्वासाचा अभाव या दुष्टचक्रात फसलेले दिसते. वास्तविक समस्यांचा स्वीकार करण्याऐवजी राजकीय अजेंड्याप्रमाणेच मोदी सरकारने अर्थव्यवस्थेचा विचार सुरू केला, म्हणजेच वित्तीय संस्थांची उपेक्षा चालवली. याचाच एक नमुना म्हणजे ग्रामीण भागातील क्रयशक्ती कमी होत असल्याचे आकडे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने समोर आणले तेव्हा हा सारा डाटा बासनात टाकण्यात आला. अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्याचे प्रयत्न करण्याऐवजी सतत राजकीय अजेंड्याप्रमाणे त्याचा विचार करणे मोदी सरकारला भाग पडते त्याचे मूळ कारण हेच आहे. राजकारणात चतुर हेडलाइन मॅनेजमेंटला संधी मिळते, ती लोकांना भावनात्मकदृष्ट्या व्यग्र ठेवते. कलम 370, अयोध्या प्रकरणामुळे ध्रुवीकरण होत असले तरी ते भाजपची मते प्रभावित करीत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. येत्या रामनवमीच्या आसपास अयोध्येतील श्रीराम मंदिराची कोनशिला उभारण्याची योजना आहे. त्यानंतर मंदिर उभारणीतील लोकसहभाग अधिकाधिक वाढवण्यासाठी अनेक कार्यक्रम होतील, ते 2022 मधील उत्तर प्रदेश निवडणुकीपर्यंत चालतील. धार्मिक राष्ट्रवादाच्या राजकारणाला काही मर्यादा आहेत.
 
काश्मिरातील अलीकडच्या घटनाक्रमामुळे मोदी सरकारच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला तडा गेला आहे. शिवसेनेचे बंड संधिसाधूपणाचे लक्षण ठरू शकते, परंतु सर्वांना सोबत ठेवण्यासाठी केवळ हिंदुत्व पुरेसे ठरत नाही. म्हणूनच आर्थिक संकटावर मात करण्यासाठी, मतदारांना भाजपसोबत जोडून ठेवण्यासाठी मोदी सरकारने नव्या फॉर्म्युल्याचा विचार केला पाहिजे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेना खासदार ‘पहले किसान, फिर भगवान राम’ अशी घोषणाबाजी करीत होते. याचा अर्थ वर्तमानातील संदर्भ बदलले आहेत.