Your Own Digital Platform

असुविधांनी ग्रासलेले फलटण आगार सातारा विभागात अव्वल; तर राज्यात सहावे


राज्य परिवहन महामंडळाने उत्कृष्ट कामगिरी निकषात निवडल्याने अनेकांकडून आश्चर्य


स्थैर्य, फलटण : प्रवाशांच्या गैरसोयीसाठी प्रसिद्ध असणार्‍या फलटण आगारात सुविधांच्या बाबतीत अनागोंदी असताना राज्य परिवहन महामंडळाकडून फलटण आगाराला सातारा विभागात प्रथम तर राज्यात सहावा क्रमांक दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
 
फलटण आगारात एवढा अनागोंदी कारभार असताना देखील फलटण आगाराचा जर अव्वल क्रमांक पटकावत असेल तर त्या एस.टी. महामंडळ आणि प्रशासनाला धन्यता मानवी लागेल. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राचे विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी एसटी महामंडळाच्या फलटण आगाराला धारेवर धरून आगाराची प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचना व आदेश दिले होते तरी त्याचा काहीही ही परिणाम फलटण आगारावर झाला नाही व आत्ताच्या झालेल्या पावसामध्ये फलटण बस स्थानक हे खड्ड्यात होते की फलटण बस स्थानकात खड्डे होते हे काही कुणाला कळत नव्हते. असा अनागोंदी कारभार असताना देखील फलटण आगार विभागात प्रथम आणि राज्यात सहावे कसे? असा उपरोधिक सवाल उपस्थित होत आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) माध्यमातून राज्यातील 31 विभाग आणि 250 आगरांच्या कामकाजाचा आढावा महामंडळाने घेतला असून त्यामध्ये सातारा विभागातील फलटण आगाराचा विभागात प्रथम आणि राज्यात सहावा क्रमांक आला असून त्याबद्दल फलटण आगाराचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
 
महाराष्ट्रातील या 250 आगारांपैकी केवळ 14 आगारांची कामगिरी उत्कृष्ट असल्याचे मात्र एकही विभाग उत्कृष्ट कामगिरी निकषात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 15 विभाग आणि 17 आगारांची कामगिरी चांगली, 14 विभाग व 107 आगारांची कामगिरी समाधान कारक आणि 2 विभाग व 32 आगरांच्या कामकाजात सुधारणा आवश्यक असल्याचे या पाहणीत आढळून आल्याचे या पाहणीत स्पष्ट झाले आहे.

सातारा विभागात प्रति कि. मी. उत्पन्न 27.06 रु., प्रति 10 लिटर कि. मी. 9.90, आसन क्षमतेच्या 3.52 % प्रवासी संख्या असून सातारा विभागाची कामगिरी चांगली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सातारा विभागातील सातारा, कराड आगारांची कामगिरी चांगली, तर कोरेगाव, वाई आगारांची कामगिरी समाधान कारक असल्याचे दिसून आले आहे तर लगतच्या बारामती आगाराची कामगिरी चांगली आणि बारामती चखऊउ आगाराची कामगिरी उत्कृष्ट असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वरीलपैकी पुणे विभागातील दोन्ही आगाराकडे भरपूर बसेस, सुट्टे भाग व अन्य सुविधा आहेत सातारा व कराड आगार विभाग नियंत्रकांच्या मर्जीतील आणि राजकीय दृष्टया जागृत तालुक्यातील असल्याने तेथे कामगिरी उत्कृष्ट असायला हवी मात्र तेथे कामगिरी चांगली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या उलट फलटण आगारात पुरेशा बसेस नाहीत, आहेत त्यामध्ये नादुरुस्त बसेस अधिक, दुरुस्तीसाठी आवश्यक सुटे भागांची वाणवा, काही वेळा इंधनासाठी बसेस उभ्या, वरिष्ठ कार्यालयांचे योग्य मार्गदर्शन व सहकार्य नाही तरीही केवळ प्रवाशांच्या पाठींब्यामुळेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एस. टी.) फलटण आगार सातारा विभागात अव्वल तर राज्यातही आघाडीवर असल्याचे, फलटण आगाराचे कामकाज उत्कृष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फलटण आगारात प्रति कि. मी. उत्पन्न 30 रु. आसन क्षमतेच्या 30 % प्रवासी भारमान आहे तर प्रति 1 लाख कि. मी. मध्ये अपघाताचे प्रमाण 4 % असून फलटण आगाराचे कामकाज उत्कृष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रवाशांच्या दृष्टीने या आगारातील सर्व भौतिक सुविधा कोलमडल्या आहेत, इमारत विस्तारीकरण मंद गतीने सुरु असून नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बस स्थानकावर प्रचंड चिखल, साठलेले पाणी यातून मार्ग काढून वृद्ध, महिला, मुले, अपंग, विद्यार्थी/विद्यार्थिनी यांना सुमारे एक ते दीड महिना बसेस मध्ये चढ उतार करावी लागली, त्यातच बसेसची संख्या पुरेशी नाही, आहेत त्या बसेस नादुरुस्त असून त्यासाठी सुटे भाग नसल्याने अनेक बसेस उभ्या रहात असल्याने प्रवाशांना वेळेवर बसेस उपलब्ध होत नाहीत, काही वेळा बसेस रस्त्यात बंद पडल्याने प्रवाशांची कुचंबना होत आहे, तरीही प्रतिकुल परिस्थितीकडे दुलक्ष करुन प्रवासी एस टी ला प्राधान्य देत असल्याने फलटण आगाराचे कामकाज उत्कृष्ट असल्याचे दिसून आले आहे.

फलटणचे प्रभारी आगार व्यवस्थापक राहुल कुंभार व त्यांचे सहकारी अधिकारी, चालक/वाहक, कार्यशाळा कर्मचारी यांची प्रतिकुल परिस्थितीतही अत्यंत चिकाटीने काम करुन प्रवाशांना सेवा देण्याचा प्रयत्न ही फलटण आगराला उत्कृष्ट कामगिरी असा दर्जा मिळवून देणारा असल्याचे नाकारता येणार नाही.