Your Own Digital Platform

राज्यात लवकरच भाजपा विरहीत सरकार


शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेससह मित्रपक्षाचे ठरले; मुंबईत बैठक संपन्न

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सर्वसंमती: शरद पवार; संपूर्ण मसुदा घेवून जनतेसमोर येणार: ठाकरे
स्थैर्य, मुंबई: राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी घडामोडी निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या आहेत. गेल्या महिन्याभरापासून काथ्याकूटानंतर काल प्रथमच तिन्ही पक्षांनी म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक मुंबईमधील नेहरु सेंटरमध्ये झाली. लवकरच भाजपा विरहीत सरकार स्थापन होणार असल्याचे चिन्हे गडद झाली आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सर्वसंमती झाली असल्याचे राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर सर्व विषयांवर चर्चा झाली आहे. आगामी काळात आपला एकही मुद्दा अनुत्तरीत ठेवणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी सध्या तरी अर्धवट माहितीची प्रतिक्रीया दिली आहे.
 
महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचे सूत्र निश्चित करण्यासाठी शुक्रवारी दुपारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकत्रित बैठकीचा काथ्याकूट नेहरू सेंटरमध्ये सुरू आहे. या महत्वपुर्ण बैठकीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे केंद्रिय नेते आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे, केंद्रीय नेते अहमद पटेल, के. सी. वेणूगोपाल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, मोहम्मद अरिफ नसिम खान आदी प्रमुख नेते उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, रिपाई कवाडे गट, समाजवादी पार्टी, जनता दल, रिपाई खरात गट, श्रमिक मुक्ती दल, आदींसह इतर सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.

महाविकास आघाडीची बैठक जवळपास दोन तास चालली. काही कामाचे कारण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बाहेर हे बैठकीतून बाहेर आले व उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद घ्यावे, अशी इच्छा व्यक्त केली.

शरद पवार यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे बाहेर पडले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बैठकीतून बाहेर पडताना माध्यमांशी संवाद साधला.

गेल्या महिन्यात 24 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर सत्तेचा तिढा निर्माण होवून जवळपास एक महिना पुर्ण होत आला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू आहे. हा पेच सुटावा म्हणून गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचे बैठकांचे सत्र सुरू होते. आज त्याला मुर्त स्वरूप देण्यासाठी या नेत्यांचा वरळीच्या नेहरू सेंटरमधील 14 व्या मजल्यावर तब्बल 2 तास 05 मिनिटे खल सुरू होता.
 
या सरकारचे नेतृत्व कोणी करावे, किमान समान कार्यक्रम काय असणार आणि सत्तेच्या वाटपाचे सूत्र काय असणार यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी आजची बैठक सुरू असल्याचे नबाब मलिक यांनी त्यानंतर सांगितले. बर्याच मुद्यांवर सहमती झाली आहे, मुख्यमंत्रिपदाबाबत उध्दव ठाकरेंचे नाव पवार यांनी सुचवल्याचे मलिक यावेळी म्हणाले. मात्र सर्व मुद्दे उद्या पत्रकार परिषदेत मांडण्यात येतील असेही त्यांनी नमूद केले.
 
शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. राजभवनावर जावून राज्यपालांची भेट लवकरच घ्यावी आणि सत्तेचा दावा करावा, असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दावा सादर करण्यासाठी तिन्ही पक्षांच्या आमदारांच्या सह्यांचे पत्र तिन्ही पक्षांनी तयार ठेवल्याचेही खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

खाते वाटपाचे सूत्र शिवसेनेला 15, राष्ट्रवादीला 15 तर काँग्रेसला 12 मंत्रिपदे, असे असावे यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे राहणार यावरही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यावरून दोन्ही पक्षांमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. महामंडळांचे वाटप आणि वादाचे मुद्दे कोणीही उपस्थित करू नयेत यावरही बैठकीत एकमत करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.

गृह, महसूल, वित्त, कृषि, नगरविकास, गृनिर्माण, उच्चतंत्र शिक्षण या खात्यांसाठी दोन्ही काँग्रेसचे नेते आग्रही असून परिवहन, वने, सामाजिक न्याय या खात्यांबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.