Your Own Digital Platform

सोनिया गांधी, ममता बॅनर्जींना शपथविधीचे निमंत्रण!शिवसैनिकांचे प्रेरणास्थान असलेल्या दादर येथील शिवाजी पार्क मैदानात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह देशातील मान्यवरांना देण्यात आले आहे. याशिवाय राज्यातील 700 शेतकर्‍यांना या सोहळ्यास आमंत्रित करण्यात पान आले आहे. युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिल्ली येथे जाऊन सोनिया गांधी व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेऊन त्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले.
 
दादरच्या शिवाजी पार्क याच मैदानात शिवसेनेचे मनोहर जोशी यांनी यापूर्वी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच मुख्यमंत्री होत असल्याने शिवसेनेने या ऐतिहासिक सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे.

भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला होता. सुमारे महिनाभर राजकीय सत्तासंघर्षाच्या ठिणग्या उडाल्यानंतर अखेर महाविकास आघाडीकडून शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. शिवाय स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होत असल्यामुळे शिवसेनेने हा शपथविधी सोहळा अत्यंत प्रतिष्ठेचा केला आहे.

देशातील मान्यवरांना शपथविधी सोहळ्याची निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह, अखिलेशसिंह यादव यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचा यामध्ये समावेश आहे.

मनसे नेते राज ठाकरे यांनाही निंमत्रण देण्यात आले आहे. राजशिष्टाचारानुसार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या राज्य, केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेत्यांना निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. अत्यंत महत्त्वाच्या व्यक्‍तींना निमंत्रणे पाठविण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व उद्धव ठाकरे पाहात आहेत.

मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांचा जन्म कोकणात झाला आहे. पण संयुक्‍त महाराष्ट्रात जन्मलेले उद्धव हे पहिले मुंबईकर मुख्यमंत्री बनणार आहेत. त्यामुळे शिवसैनिकांसह तमाम मुंबईकरांमध्ये या सोहळ्याविषयी कमालीची उत्सुकता आहे. विविध जिल्ह्यांतील 700 शेतकर्‍यांनाही सोहळ्याला बोलावले आहे. शिवसेनेच्या प्रत्येक जिल्हाप्रमुखांवर प्रत्येकी 50 शेतकरी आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या सोहळ्याला भव्य स्वरूप आणण्यासाठी व्यासपीठ उभारण्याची जबाबदारी कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्यावर सोपवली आहे. या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले जाणार आहे. भव्य व्यासपीठ, 60 हजार खुर्च्या, 20 एलईडी आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. अत्यंत कमी वेळेत ही तयारी करणे शक्य नसल्यामुळे शिवसैनिकही मदतीसाठी पुढे सरसावल्याचे समजते. बुधवारी सकाळीच कलादिग्दर्शक देसाई यांनी शिवाजी पार्क मैदानाचा ताबा घेऊन शपथविधी समारंभाची तयारी सुरू केली.