Your Own Digital Platform

सामंजस्यामुळे सावरला संसार....


कुठल्याही नात्यात महत्त्वाचा असतो तो विश्वास. पती-पत्नीमधल्या नात्यात तर त्याचं महत्त्व सर्वाधिक. कुठं ताणायचं, कुठं सैल सोडायचं, कुठं स्पेस द्यायची हे एकदा समजून घेतलं की त्या नात्याची नौका पार होतेच. कितीही मोठी अडचण-पेच समोर उभा राहिला तरीही. वैद्यकीय व्यवसाय करताना लेखिकेला भेटलेल्या जोडप्याचा हा अनुभव...

राकेशला ताप येऊन महिना लोटला होता. मलेरिया, डेंग्यू, विषमज्वर, रिकेट्शिया अशा शक्यता असलेल्या सगळ्या प्रकारच्या तापांसाठी एकानंतर एक उपचार देणे चालू होते. पण ताप कमी होण्याची चिन्हे काही दिसेनात. राकेश एका संस्कारी कुटुंबातला सरळमार्गी मुलगा होता. त्याचं लग्न होऊन 4-5 वर्षेच झाली होती. त्याला 2 वर्षांचा लहान मुलगा होता. राकेश सरकारी नोकरीत असल्याने आजारपणामुळे सुट्टीचा प्रश्न निर्माण होऊ लागला. हा 1998-99 चा काळ होता. एड्सचे रुग्ण मोठया प्रमाणात सापडत असत. शंका नसतानाही न राहवून मी एचआयव्हीची तपासणी केली. अनपेक्षितपणे त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली. हा माझ्यासाठी, त्याच्या नातेवाइकांसाठी, बायकोसाठीही मोठा धक्का होता. इतका साधा, सरळ माणूस. याला एड्स असणे कसे शक्य आहे? असे सारखे वाटत होते. पण सत्य मोठे कठीण असते. ते स्वीकारणे अपरिहार्य होते. मी आणि त्याचे डॉक्टर नातेवाईक आता पुढचा विचार करू लागलो. आम्ही आमच्या उपचारात बदल केले. त्याची तब्येत सुधारू लागली.

शमा त्याची बायको, सुशिक्षित, सुसंस्कारी होती. हे कळल्यावर ती प्रचंड अस्वस्थ झाली. नवर्‍याच्या चारित्र्यावर पूर्ण विश्वास असतानादेखील तिला काहीच सुचेनासे झाले. आपल्या सोन्यासारख्या संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली या विचाराने सैरभैर झाली. तिला एकीकडे नवर्‍याला सोडून निघून जावे असे वाटू लागले, तर दुसरे मन खात्रीने नवर्‍याची बाजू स्वच्छ असल्याची ग्वाही देत होते. काय करावे काहीच कळेना! डॉक्टर म्हणून राकेश व त्याच्या पत्नीशी एकत्र बसून बोलणे अत्यंत महत्त्वाचे होते. कालांतराने राकेश बरा झाला आणि घरी गेला. यानंतर काय, हाच विचार माझ्या मनात घोळत होता. काही दिवस राकेश, त्याचे डॉक्टर नातेवाईक वा शमा कोणीच भेटले नाही. लहान मुलगा असल्याने कुटुंब विस्कळीत होऊ नये, मुलाचे भवितव्य, त्याचा रक्ताचा रिपोर्ट, हे सारे मनात घोळत होते. दोन महिने झाले, मीही सगळे विसरल्यासारखे झाले.

अचानक एक दिवस शमा आणि राकेश दोघेही माझ्या ओपीडीत आले. परत मन विचारात गुरफटले. पण दोघेही सुशिक्षित, समजदार असल्याने त्यांनी हा प्रश्न उत्तमरीत्या हाताळला होता. सर्वप्रथम एकमेकांना विश्वासात घेऊन त्यांनी नाते मजबूत केले. यामध्ये आपल्या दोघांचाही दोष नाही याची खात्री केली. मुलाची तपासणी केली. त्याच्या रक्तात दोष नव्हता. आता दोघांनी पुणे गाठले. दोघांच्याही रक्तातील विषाणूंचा प्रादुर्भाव किती आहे ते तपासून घेतले. रक्तातील विषाणूंची संख्या जास्त नाही हे कळल्यावर ती वाढू नये यासाठी त्या वेळी गावात उपलब्ध नसलेला औषधोपचार सुरू केला होता. मला ऐकून खूप छान वाटले. त्यानंतर त्यांच्या पुण्याला नियमित चकरा होऊ लागल्या. शमा व राकेश मला नियमितपणे रिपोर्ट आणून दाखवत. गावात कुणालाच काही माहीत नसल्याने पुनश्च त्यांचा संसार सुरू झाला.