Your Own Digital Platform

आजपासून पुणे येथे गोवंश जागतिक परिषद


स्थैर्य, पुणे : कामधेनू सेवा प्रतिष्ठानतर्फे शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत ‘वर्ल्ड काऊ कॉन्फरन्स अँड ग्री एक्स्पो’ अर्थात देशी गोवंश जागतिक परिषदेचे आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे. स.नं. 37, 42 साई चौक, बालेवाडी रोड, ग्यानबा सोपानराव मोझे कॉलेज समोर, बालेवाडी- हवेली, पुणे येथे 29 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता, राष्ट्रीय कामधेनु आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथीरिया यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. या परिषदेचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर भूषविणार आहेत,तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार गिरीष बापट, आमदार चंद्रकांत पाटील आणि एम.आय.टी.चे उपाध्यक्ष राहुल कराड उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कामधेनु सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक रत्नपारखी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
 
या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय कामधेनु आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथीरिया, ‘वर्ल्ड काऊ कॉन्फरन्स अँड ग्री एक्स्पो’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर, कामधेनु सेवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजय ठुबे, सचिव समीर देवधर, सल्लागार मिलिंद देवल आदी मान्यवर उपस्थित होते. ‘वर्ल्ड काऊ कॉन्फरन्स अँड ग्री एक्स्पो’ अर्थात देशी गोवंश जागतिक परिषदेमध्ये गोपालन आणि त्याच्याशी संबंधित भारतातील तसेच अमेरिका, ब्राझील, स्वीडन आणि कॅनडामधील पशूतज्ज्ञ आणि गोवंश अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत.

यानिमित्त आयोजित गो-प्रदर्शनामध्ये भारतातील तीस जातीवंत देशी गोवंश पहालया मिळणार असून त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती देखील विविध माध्यमांव्दारे दिली जाणार आहे. या तीन दिवसीय परिषदेत भारतातील सर्व गोवंशांचा परिचय, आदर्श गोपालकांच्या मुलाखती, ए-2 मिल्कचे महत्त्व, दुग्धजन्य उत्पादनांची निर्मिती, गोआधारित कृषी उत्पादनांची निर्मिती, गोआधारित मानवी आरोग्य विषयक उत्पादनांची निर्मिती, गोपालनामधील नवीन क्षितीजे, शुद्ध आणि उच्च गोवंश निर्मिती व पैदास धोरण, नंदी शाळा, स्वयंपूर्ण गोशाळ आणि सामाजिक दायीत्व अशा विविध विषयांवर मार्गदर्शन, चर्चा आणि व्याख्याने होणार आहेत. गोपालन व्यवसायाला सन्मान प्राप्त करून या क्षेत्राकडे पाहण्याचा नवीन पिढीचा दृष्टिकोन विकसीत करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.

भारतीय गोवंशाला गतवैभव प्राप्त करून देणे हा या परिषदेचा मूळ हेतू आहे. विज्ञानाच्या शास्त्रीय कसोट्यांवर भारतीय गोवंशाची गाय सिद्ध झाली असून ही सिद्धता तळागाळातील शेतकरी आणि गोपालकांपर्यंत तसेच सर्वच क्षेत्रातील नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या तीन दिवसीय परिषदेचे आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गोपालक आणि गोशाळा यांना संघटीत करणे, गोशाळांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, शुद्ध आणि उच्च दर्जाच्या गोवंशाची निर्मिती करणे असे विविध उद्देश डोळ्यासमोर ठेवून या परिषदेची आखणी करण्यात आली आहे.