Your Own Digital Platform

अजून काहीच ठरलं नाही; माध्यमांनी नको त्या चर्चा करु नयेत: अजित पवार


स्थैर्य, बारामती : काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं अजुन काहीही ठरलेलं नाही. माध्यमांनी उगाच नको त्या चर्चा करून नये, असे विधान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांनी केले.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विश्वासावर शिवसेना एनडीए मधून बाहेर पडली मात्र सत्ता स्थापनेचं अजुन काहीच ठरेना. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नुसत्या चर्चाच सुरूच असून त्यातून अजुनतरी काहीही ठोस निघण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढलीय. त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हे विधान शिवसेनेच्या चिंतेत वाढ करणारेच आहे. 
 
अजित पवार यावेळी म्हणाले, आमदार फुटण्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही.अनेकजण पहिल्यांदाच निवडून आलेले असल्याने फुाटाफूट होणार नाही. काहींनी पक्ष सोडल्यावर काय निकाल लागतो हे सातार्‍यात सगळ्यांना दिसलंय. त्यामुळे आता कुणी असं करणार नाही. कर्नाटकचा निकाल काय लागला हेही जनतेने पाहिले आहे.जर कुठल्या पक्षाने कुठल्या पक्षाचे आमदार फोडले तर इतर तिन्ही पक्ष एकत्र येवून त्यांचा पाडाव करतील. काही फॉर्म्युला ठरला याबद्दलच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही.अद्याप काहीही ठरलेलं नाही. याबद्दल त्या त्या पक्षाचे सर्वोच्च नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत या सगळ्या वावड्याच आहेत. आता 19 नोव्हेंबरला सोनिया गांधी आणि पवारसाहेबांची भेट होईल. त्यानंतर सगळे चित्र स्पष्ट होईल.

अजित पवार पुढे म्हणाले, सध्या शेतकर्‍यांना दिलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. प्रत्यक्ष नुकसान पाहून मदत दिली पाहिजे. सध्या राष्ट्रपती राजवट आहे. त्यामुळे सगळे निर्णय केंद्रातून होतात. या पार्श्वभूमीवर आमचे सगळे खासदार याबद्दल केंद्रात आवाज उठवून शेतकर्‍यांना दिलासा देतील.

भाजपनं काय बोलावं हा त्यांचा प्रश्न. आज त्यांच्याकडे बहुमत असताना त्यांनी सत्ता स्थापन केली नाही. आम्ही विरोधी पक्षात बसण्याच्या मानसिकतेत होतो. मात्र आता राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर सत्तेबाबत मार्ग काढता येतोय का याबद्दल सगळेच प्रयत्न करतायत. जोपर्यंत 145 च्या पुढे आकडा होत नाही तोपर्यंत गोड बातमी येणार नाही. आणि तोपर्यंत आपल्याला राष्ट्रपती राजवटीतच आपल्याला रहावं लागेल, असेही अजित पवार म्हणाले.