Your Own Digital Platform

खिचडी शिजतीयेआमचं ठरलं; आज शिवसेनेशी चर्चा: पृथ्वीराज चव्हाण

स्थैर्य, नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दिल्लीतील काथ्याकूट अखेर पार पडला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील चर्चा पूर्ण झाली आहे. आज शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी सर्वजण मुंबईत दाखल होणार आहेत व त्यानंतरच कदाचित आम्ही राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. दरम्यान, स्थापन होत असलेल्या या संभाव्य सरकारला खिचडी सरकार म्हणून नामकरण केलेल्यांनी खिचडी शिजतीये, असे संबोधले आहे.

दिल्लीमधील बैठकींचा टप्पा पार पडल्याचे चव्हाण यांनी सांगितले. उर्वरित चर्चा आजपासून मुंबईत होणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. सर्व मुद्यांवर चर्चा पूर्ण चर्चा होऊन सहमती झाली आहे. आम्ही आता मुंबईला प्रयाण करणार आहोत. मुंबईत आल्यानंतर आघाडीतील मित्र पक्षांशी चर्चा करून शिवसेनेशी बोलणी केली जाईल, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
 
हा सर्व चर्चेचा टप्पा पार पडल्यानंतर तिन्ही पक्ष फॉर्म्युला काय असेल याची माहिती पत्रकार परिषदेत दिली जाईल असेही चव्हाण म्हणाले. राज्यात महाविकास आघाडी (शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी) सरकार अस्तित्वात येण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच दूर करण्यासाठी दिल्लीत आघाडीच्या नेत्यांनी तळ ठोकला होता. कालपासून प्रदीर्घ अशा बैठकांमधून महाविकास आघाडीला मूर्त स्वरूप आणि किमान समान कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्यासाठी खल सुरू होता.

काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनाएकत्र येऊनमहाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी दिल्लीसह महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जर आमचे शिवसेनेसोबत सरकार स्थापन झाले, तर पाच वर्षे काय पुढचे पंधरा वर्षे चालेल. 

- जयंत पाटील, 

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी