Your Own Digital Platform

मधुरा वेलणकर यांनी दिला समानतेचा संदेश

स्थैर्य, सातारा : गप्पांची मैफिल कार्यक्रमप्रसंगी दीपप्रज्वलन करताना अभिनेत्री मधुरा वेलणकर, विनोद कुलकर्णी, अतुल जाधव, बाळासाहेब गोसावी.

मसाप, शाहुपुरी शाखा आणि जनता सहकारी बँकेच्या उपक्रमास सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्थैर्य, सातारा: आतापर्यंत विविध चित्रपट, नाटकांतून दमदार आपल्या अभिनयाने रसिकांच्या मने जिंकलेल्या अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी आता लेखण क्षेत्रात पदार्पण केले असून त्यांचे ‘मधुरव’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. दर्जेदार अभिनयांबरोबरच त्यांचे लिखाणही तितकेच उत्कृष्ट असून त्याचबरोबर त्यांची मतेही रोखठोक आणि ठाम असल्याचे साता-यात त्यांच्याबरोबर रंगलेल्या गप्पांच्या मैफिलीमधून दिसून आले. आतापर्यंतच्या प्रवासांवर आणि लिखाणावर दिलखुलास मते व्यक्त करतानाच त्यांनी स्त्री-पुरुष समानतेचा दिलेला संदेश सातारकरांना भारावून गेला. निमित्त होतं मसाप, शाहुपुरी शाखा आणि जनता सहकारी बँक लि. आयोजित गप्पांच्या मैफिलीचं, संवादक होते विनोद कुलकर्णी.

साता-यातील शाहकुला मंदिर येथे झालेल्या मैफिलीची सुरुवात मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करुन झाली. यावेळी बँकेच्या भागधारक पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी, चेअरमन अतुल जाधव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी, संचालक माधव सारडा, आनंदराव कणसे, वजीर नदाफ, व्यवस्थापक प्रशांत शास्त्री, मसाप शाहुपुरी शाखेचे अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, संजय माने, प्रकाशक शैलेश नांदूरकर उपस्थित होते. मैफिलीच्या सुरुवातीस अभिनेत्री वेलणकर यांनी दस-याच्या मुहुर्तावर प्रकाशित झालेल्या ‘मधुरव’ची पहिली आवृत्ती संपली असून नुकतीच दुसरी आवृत्ती प्रकाशित झाल्याचे सांगत रसिक प्रेक्षकांच्या प्रतिसादाने भारावून गेल्याचे सांगितले. त्यानंतर अभिनय क्षेत्रात कशाप्रकारे आले, मिळालेली कामे, प्रत्येक काम करताना आलेले अनुभव त्यांनी सांगितले. सातारा परिसरात ‘मी अमृता बोलतोय’ चित्रपटाचे चित्रीकरण करताना आलेला प्रसंग उपस्थितांना शहारून गेला. गप्पांच्या मैफिलीतून अनुभव सांगण्याबरोबरच त्यांनी नकळत दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना स्पर्श केला. तुम्ही कोणत्याही प्रकारचे शिक्षण घ्या ते कधीही वाया जात नाही. काही करायचे हे जसे कळायला हवे त्याचबरोबर कुठे थांबायचे हे कळणेही महत्वाचे आहे. चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करण्यातील फरक बारकाईने त्यांनी उदाहरणासह स्पष्ट करुन सांगितला. दोन्ही माध्यमांची आव्हाने, बलस्थाने सांगितले. मालिका विश्वाबद्दल बोलताना त्यांनी सडेतोड मते व्यक्त केली. विशेषतः सध्या सुरु असलेल्या मालिकांच्या सादरीकरणाबद्दल नाराजी व्यक्त करत समाजात स्त्री-पुरुष समानता रुजवण्याची गरज असताना मालिकांमध्ये मात्र उलट चित्रीकरण दाखवले जात असून महिला वर्गच ते जास्त बघत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. स्पर्धेच्या युगात स्त्री-पुरुषांना समान वागणूक असायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळेच मालिका विश्वात जास्त रमत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले परंतु चांगला दर्जेदार आशय असलेली मालिका आली तर नक्की काम करेन असेही स्पष्ट केले. लिखाणाची सुरुवात कशा पध्दतीने झाली हे सांगत ‘मधुरव’ हे पुस्तक एका मासिकात लिहिलेल्या विविध विषयांवरील लेखांचे संग्रहित पुस्तक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पुस्तकातील प्रत्येक लेखातील माझा खरा आवाज आहे. मला मनापासून जे वाटते ते मी करते असेही त्यांनी स्पष्ट केले. बालनाटय शिबिराबद्दल बोलतांना पालक पाल्यांना चौकटीत बांधायला जातात ते त्यांनी टाळले पाहिजे, त्यांना त्यांचे बालपण एन्जॉय करु द्या. त्यांना शिकू द्या, घडू द्या. स्पर्धेच्या आयुष्यात त्यांचा निरागसपणा हरवू देऊ नका त्यांना नैसर्गिक आणि खरे राहू द्या असा सल्ला दिला. यावेळी संवादक विनोद कुलकर्णी यांनी सातारकरांना तुम्ही गाताना ऐकायला आवडेल असे सांगितल्यानंतर त्यांनी संदीप खरे यांच्या ‘राधे रंग गोरा तुझा कशाने गं रापला’ ही कविता म्हणताच सातारकरांनी टाळयांचा कडकडाट केला. जे आवडते ते करण्याचा प्रयत्न करत रहावा असे सांगत गप्पांच्या मैफिलीचा शेवट झाला. त्यानंतर प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी दिलखुलास आणि मनमोकळयापणाने उत्तरे दिली.

प्रारंभी मान्यवरांचा मसाप,शाहुपुरी शाखा आणि जनता सहकारी बँकेच्यावतीने स्वागत आणि सत्कार करण्यात आला. तसेच अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्याहस्ते जनता बँकेतून निवृत्त झालेले दिलीप लंगडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विनोद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी तर आभार जनता सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी यांनी मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, जनता सहकारी बँकेचे सर्व संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी, कर्मचारी, सभासद, मसाप शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, सभासद आणि सातारकर मोठया संख्यने उपस्थित होते.