Your Own Digital Platform

‘जरंडेश्वर’ परत मिळवून देण्याची जबाबदारी उदयनराजे यांच्यावर : शालिनीताई पाटील


स्थैर्य, सातारा : जरंडेश्वर कारखाना सभासदांना परत मिळवून देण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मदत करावी, त्यासाठीची जबाबदारी उदयनराजे यांच्यावर सोपवत असून, ते ही जबाबदारी स्वीकारतील, अशी अपेक्षा माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केली.

राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळा बाहेर काढणारे, त्यासाठी न्यायालयामध्ये दीर्घकाळ लढा देणारे सहकारातील अभ्यासक व माजी आमदार माणिकराव जाधव आणि ऍड. सतीश तळेकर यांचा सत्कार येथे आयोजित केलेल्या शेतकरी परिषदेत झाला. त्यावेळी श्रीमती पाटील बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, जरंडेश्वर कारखाना परत मिळवून देण्यासाठी आतापर्यंत माणिकराव जाधव आणि ऍड. तळेकर यांचे मोठे सहकार्य झाले आहे. या दोघांच्या सहकार्याची यापुढेही आवश्यकता आहे. विशेषत: ऍड. तळेकर यांनी कायदेशीर बाबींसंदर्भात मदत करावी. केंद्रातील भाजपचे सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याची जबाबदारी उदयनराजे यांच्यावर सोपवण्यात येत आहे.’’ ते ही जबाबदारी स्वीकारतील, असा विश्वासही श्रीमती पाटील यांनी व्यक्त केला.

माणिकराव जाधव म्हणाले, राज्यातील सहकारी चळवळीचा जगभर लौकिक होता; परंतु 1980 नंतर शरद पवार यांच्या धोरणामुळे अनेक साखर कारखाने आजारी पडले. राज्याची सुरू झालेली घसरण आजपर्यंत थांबली नाही. जरंडेश्वर’चा समावेश पॅकेजमध्ये झाला असता, तर हा कारखाना कर्जमुक्त झाला असता आणि त्याच्या विक्रीची वेळच आली नसती.