Your Own Digital Platform

असूरन एक सर्वकालीन सत्य


’असुरन’ प्रचंड हिंसक आहे. पण त्याला कोणत्याही दृष्टिकोनातून एक क्षणभरसुद्धा नाकारता येत नाही. असुरन’ मध्ये मांडलेलं भीषण वास्तव हे सार्वकालिक सत्य आहे. असुरन’च्या हिंसेत पराकोटीची हतबलता आणि समग्र बंडखोरी ह्याच्या बांधावर उभं राहावं लागणार्‍या माणसांच्या जगण्याची अंतिम धडपड, त्यांच्या काळजातलं कारुण्य ओतप्रोत भरलेलं आहे. जातधर्मसत्ता ह्याच्या अभेद्य आणि अमर्याद शोषणाच्या क्रूर रणगाड्याखाली कायमच चिरडल्या गेलेल्या दलित-शोषित माणसांचा जगण्याच्या आणि कुठल्याही परिस्थितीत आपलं सर्वस्व टिकवून ठेवण्याच्या आदिम झटापटीशी जोडला गेलेला हजारो वर्षांचा सातत्याने चालत आलेला संघर्ष म्हणून आपल्याला असुरन’कडे पाहावं लागतं.

भारतीय चित्रपटसृष्टीचा विचार करता इथल्या हजारो वर्षांच्या जातिव्यवस्थेवर, त्यातून निर्माण झालेल्या सत्ता-संपत्ती-संसाधनांच्या भयंकर विषमतेवर, शोषणावर, धर्म-संस्कृतीच्या दांभिकतेवर रोखठोक भाष्य करणार्‍या ज्या काही मापदंड म्हणाव्यात अशा कलाकृती आहेत त्या निर्माण करण्यात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा आणि त्यातही तामिळ चित्रपटसृष्टीचा फार मोठा वाटा आहे. अलीकडच्या काळातली तामिळमधून असणारी महत्त्वाची उदाहरणे सांगायची झाल्यास त्यात पा. रंजिथचा काला’, मारी सेल्वराजचा पेरियार पेरूमल’ ह्या ठळक कलाकृती दिसतात. हिंदी चित्रपटसृष्टी असो वा मराठी... हाताच्या बोटावर मोजण्याइतके काही अपवाद वगळता सुमार चित्रपटांचा सध्या सुकाळ म्हणावा असे वातावरण असताना... एकूणच सध्याच्या आणि नेहमीच्याच गल्लाभरू हिंदी-मराठी चित्रपटांच्या भाऊगर्दीत संवेदनशील सुजाण रसिक प्रेक्षकांनी कुणाकडे बघावे हा मोठा प्रश्न असताना... साहजिकच तामिळ चित्रपटसृष्टीकडे आणि तिथे घडून येणार्‍या दलित-शोषित जाणिवांच्या नव्या आविष्काराकडे लक्ष जाते. दिग्दर्शक वेट्रीमारनचा महिनाभरापूर्वी म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होऊन अद्यापही दीड महिन्यांनंतरही तामिळ कलाविश्वात प्रचंड चर्चेत असणारा असुरन’ ह्या यादीतला अढळ स्थान कमावलेला चित्रपट ठरू शकेल.

असुरन’ तसा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोचायला बराच वेळ लागला असेच म्हणावे लागेल. ह्याला कारण म्हणजे आपली झापडबंद माध्यमे आणि त्यांची आपल्याच सुरक्षित मध्यमवर्गीय कोषात रममाण राहण्याची, हवाबंद डब्यात बागडण्याची कोती मनोवृत्ती होय. बाहेरची हवा आपल्या सोवळ्यातल्या अवताराला लागू द्यायची नाही आणि आपलं काही पुणे-मुंबई-पुणेच्या बाहेर जाऊ शकेल ह्या तोडीचं बनवायची धमक ठेवायची नाही ही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ठाण मांडून बसलेल्या, कलेच्या क्षेत्रातील सर्व आर्थिक जातीय हितसंबंध आणि राजकीय नाड्या आपल्या हातात ठेवून भातुकलीच्या सर्कशी करण्यातच धन्यता मानणार्‍या विशिष्ट लोकांची अट्टल आत्ममग्नता ह्याला कारणीभूत म्हणावी लागेल. हिंदीचा तर सगळा कारभारच रॉयल आणि निराळा. दिवसागणिक देशभरात दलित-शोषित-वंचितांचे प्रश्न कठीण होत जात असताना, सांस्कृतिक पटलावर कलाकृतींच्या माध्यमातून जातिव्यवस्थेविरुद्ध आरपार एल्गार पुकारण्याची निकड दिवसेंदिवस प्रबळ होणे गरजेचे असताना - मराठी असेल वा हिंदी असेल - ह्या दोन्ही चित्रपटसृष्टीत कधीतरीच धूमकेतू दिसावा तशा विरळ धाडसी कलाकृती दिसतात.

(क्रमश:)