Your Own Digital Platform

करंजेतील प्रार्थनास्थळाचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी पालिकेची नोटीस


करंजे ग्रामस्थांचा नगराध्यक्षांच्या दालनात ठिय्या

स्थैर्य, सातारा: करंजे गावठाणातील सर्वे नं 85 येथील प्रार्थनास्थळाचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी करंजे ग्रामस्थांनी सोमवारी नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या दालनात ठिय्या दिला .पालिकेने मकसूद महंम्मद, शरीफ आतार इतर सात जणांना नोटीस बजावली असून प्रार्थनास्थळाचे अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासाठी तीस दिवसाची मुदत देण्यात आली आहे.

करंजे गावठाण परिसरातील प्रार्थनास्थळाच्या अनधिकृत बांधकामाचा विषय गेल्या काही महिन्यापासून चर्चेत आहे . करंजे येथील सर्वे क्रमांक85 ही जागा स्मशानभूमीसाठी आरक्षित आहे . असे असताना येथे उभे राहिलेल्या प्रार्थनास्थळामुळे वादाला सुरवात झाली आहे . भानुदास नामदेव राऊत यांच्यासह करंजेतील 226 ग्रामस्थांनी तक्रार अर्ज केल्याने मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सोमवारी दि 4 रोजी मकसूद महमंद, शरीफ आतार इतर सात जणांना नोटीस बजावली . तत्पूर्वी भाग निरीक्षक सतीश साखरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबधितांना 52-53 ची नोटीस बजावली . मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी संबधितांनी अनधिकृत बांधकाम तीस दिवसात पाडावे अन्यथा ते अतिक्रमण विभागाकडून पाडण्यात येईल अशी नोटीस बजावली.

दरम्यान करंजे ग्रामस्थांनी नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या दालनात ठिय्या देत त्यांच्याशी चर्चा केली . जोपर्यंत कारवाईची तारीख मिळत नाही तोपर्यंत हटणार नसल्याची आग्रही भूमिका घेतली.
 
माधवी कदम यांनी शहर विकास विभागाला पाचारण करून मुख्याधिकार्‍यांशी चर्चा केल्यावर यंत्रणेची सूत्रे हलली . शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी नगराध्यक्षांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली व कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला . करंजे ग्रामस्थांच्या वतीने नगराध्यक्षांना निवेदन सादर करण्यात आले .