Your Own Digital Platform

बातमी नको पण ब्रेकिंग न्यूज आवर...


बातमी नको पण ब्रेकिंग आवर’ असे म्हणायची वेळ गेल्या काही दिवसांत या महाराष्ट्राच्या प्रेक्षक मायबापांवर आली होती बातमी नको पण ब्रेकिंग आवर’ असे म्हणायची वेळ गेल्या चार दिवसांत या महाराष्ट्राच्या प्रेक्षक मायबापांवर आली होती. प्रत्येक चॅनल, प्रत्येक अँकर, बूम’ घेतलेला प्रत्येक रिपोर्टर त्यांच्या त्यांच्या अजेंड्या’नुसार आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज’ दाखवत होता... टीव्हीचे आगमन झाले तेव्हा त्याला इडियट बॉक्स’ म्हटलं होतं. कौन बनेगा मुख्यमंत्री’चा सध्याचा खेळ कसाही चालो, पण या बॉक्समधून समोर येणारे वार्ताहर- अँकर -विश्लेषक इडियट’ आहेत की त्यांना पाहणारे तुम्ही, का या दोघांचा सुज्ञपणा समजू न शकलेले या वाहिन्यांचे सूत्रधार? या प्रश्नावर यानिमित्ताने थोडा विचार व्हायला पाहिजे, ब्रेकिंग न्यूज’ न करता...

आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज’ सर्वात आधी आमच्या च्यानलवर’ अशी सनसनाटी काहीतरी चित्रविचित्र आवाज आणि दृश्याच्या इफेक्ट्ससह चित्कार काढणारी ग्राफिक्स पडद्यावर झळकणार... मग एक अँकर दुसर्‍या वाहिनीच्या अँकरच्या स्वरपट्टीशी स्पर्धा करीत त्याहून उच्चस्वरात घोषित करणार, की ‘तुमच्यापर्यंत’ एक कमालीची उत्कंठावर्धक बातमी घेऊन आम्ही येत आहोत.... लगेच वर्षा, चव्हाण सेंटर, भाजप कार्यालय, मातोश्री अशी पक्ष किंवा नेतासूचक दृश्य उमटणार.... स्क्रीनवर लिहिलेली तीच तीच दोन वाक्यं चार-पाच वेळा ओरडून झाल्यावर अँकर रिपोर्टरकडे टॉस करते आणि तिथे उन्हातान्हात पाय झिजवत उभा असलेला वार्ताहर बिचारा तडफडत बळेच तोंडावर उत्कंठा आणत आत्ताच या ठिकाणी’ कुठला नेता गाडीतून उतरून इमारतीच्या आत शिरतोय, अशी महत्त्वाची माहिती देतो आणि ‘आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी’ बातमी ऐकण्यासाठी ताटकळलेला प्रेक्षक चॅनलला शिव्या देत पुन्हा टीव्हीसमोरच बसतो याचा संजीवन अनुभव या सप्ताहात महाराष्ट्रातील तमाम जनतेने घेतला.कधी अँकरचे निरूपण तर कधी रिपोर्टरचे विश्लेषण याचा भडिमार त्याच्यावर होत राहतो. त्याच्या कॅमेरावाल्याने कधी जिवाची बाजी लावून ती दृश्यं टिपली किंवा उच्चस्तरीय ‘सूत्रां’कडून ही बातमी आपल्याला - फक्त आपल्यालाच- कशी मिळाली हे जिवाच्या आकांताने सांगत राहतो. उन्हाचा चटका असह्य झाल्यावर मनातल्या मनात चडफडत थंडगार स्टुडिओत बसलेल्या अँकरकडे पुन्हा टॉस करतो आणि ते अँकर या सगळ्या शक्यता जणू आत्ताच नव्याने समजल्या आणि जणू त्यातलं काहीतरी एक पुढच्या साडेतीन मिनिटांत घडूच शकतं, ते सारं तेवढाच गंभीर अभिनय करीत पुन्हा सांगतात. काही वेळानंतर स्टुडिओत आणलेले विद्वान पुन्हा या शक्यतांवर चर्चा करतात. अवघ्या 37 मिनिटांपूर्वी त्यांनी त्याच शक्यतांवर चर्चा केलेली असते, तरीही पुन्हा ते नव्यानेच काहीतरी वेगळे सांगत असल्यासारखे बोलत राहणार... हे सगळं चालू असताना तुमच्या पडद्यावर खालून, डाव्या बाजूने, ग्राफिक्सच्या मध्येमध्ये खाजेच्या औषधापासून ते नव्याने आलेल्या विद्यापीठापर्यंत वेगवेगळ्या जाहिराती आलेल्या आहेतच. तर आता पूर्ण पडदा जाहिरातींना अर्पण करायची वेळ होईल. मग छोट्याशा विश्रांती’नंतर तुम्ही परत याल, तेव्हा नव्याने पडद्यावर ब्रेकिंग न्यूज’ झळकत असेल. कॅमेरा वेगळ्या लोकेशनला गेलेला असेल. इमारतीच्या पोर्शमध्ये ऐटीत वेगळी गाडी येईल आणि वेगळा नेता उतरून आत जाईल. आणि पुन्हा मगाचंच गुर्‍हाळ नव्या उत्साहात सुरू होईल.

रविवारी संध्याकाळी भाजपने आपण सरकार बनवू इच्छित नाही, असं सांगितल्यापासून ते मंगळवार रात्रीपर्यंत वेगवेगळ्या वाहिन्यांच्या पडद्यावर दर 11 ते 12 मिनिटांच्या अवधीने हा खेळ तुम्ही पाहिला असेल. थोडे जाणते असाल, तर त्यातला फोलपणा तुम्हाला कळेल. पण थांबा, हे सगळं पाहून तुम्ही वाहिन्यांना हसणार आहात का?तर मग टीव्ही बंद करून वर उल्लेखलेल्या कोणत्याही स्थळी जा... तुम्ही पडद्यावर पाहता, त्या वार्ताहरासारख्या असंख्य वार्ताहरांची झुंबड तुम्हाला तिथे दिसते. त्यातले कित्येक जण किती उथळ आणि बिनडोक आहेत हे तेथील पाच मिनिटांच्या निरीक्षणात तुमच्या लक्षात येईल. च्यानलचा बूम हातात आल्यावर आपणच सरकार बनवू किंवा पाडू शकतो, ही प्रत्येकाच्या चेहर्‍यावरील घमेंड तुम्हाला अचंबित केल्याशिवाय राहत नाही. त्यात समजूतदार, जाणते, सुज्ञ असेही आहेत, पण ते थोडेच. बाकीचे ऑन एअर किंवा ऑफ एअर कोणाचे सरकार बनणार यावर त्यांची राजकीय बुद्धिमत्ता पाजळत राहतात. काही क्षणांत त्यांच्या असाइनमेंटचा फोन येतो आणि दुसर्‍या एखाद्या चॅनलने ब्रेक केलेल्या बातमीचा पिच्छा करण्यासाठी जेरीस येतात. त्याने ती ब्रेक’ केली म्हणून आपल्यालाही काहीतरी ’ब्रेक’ करावं लागेल या ब्रेकाब्रेकीच्या बिनडोक स्पर्धेत सगळेच सामील होत दुसर्‍या चॅनलला शिव्या हासडत स्वत:ही तेच करीत राहतात. दाटीवाटीने एकमेकांच्या शेजारी फुटभर अंतरावर उभं राहून एक्सक्लुझिव्ह’ देण्यासाठी धडपडत राहातात. लाइव्ह नसेल तेव्हा थेट सोनिया किंवा पवार अथवा पीएमओ किंवा थेट रेशीमबाग यांच्याशी फोनवर बोलत असल्याच्या आविर्भावात असतात.

हे झालं फील्डवरचं. चॅनलच्या स्टुडिओमध्ये तर अजब खेळ सुरू होते. आपण पत्रकार आहोत हे विसरून जाऊन सत्तेच्या पायी निष्ठा वाहिलेले संपादक, अँकर बघून आपण हबकून जातो. बातमी कोणतीही असो, विषय काहीही असो, गेल्या दहा-दहा वर्षांपासून तेच तेच विश्लेषण करणारे विश्लेषक तिथे हमखास सापडतात. कमर्शियल ब्रेक’ सुरू होऊन कॅमेर्‍यावर लुकलुकणारा लाल दिवा बंद झाला, की त्यांच्यातही मोकळ्या गप्पा सुरू होतात. आईशप्पथ, हे राज्यपाल दोन दिवस एका पक्षाला आणि दुसर्‍याला एकच कसा देतात?’, काँग्रेस हायकमांडच्या पत्राचा काय संबंध? राष्ट्रवादीचं पत्र तरी कुठे आलं?’, राष्ट्रपती राजवट आली तर काय झालं? हे तिन्ही पक्ष सावकाशीने जुळवाजुळव करतील.’ अशी खरी’ चर्चा रंगते. तिथे तुम्हाला हेही कळतं की काही काही विश्लेषक, संपादक व्यासंगी आहेत, अभ्यासपूर्ण बोलू शकणारे आहेत. पण कॅमेर्‍यासमोर ते सगळं करू शकत नाहीत. एक तर सेकंदाच्या दराने वेळ विकल्या जाणार्‍या या माध्यमाच्या व्यवसायाला पुढचे चोवीस तास काहीही महत्त्वाचं घडणार नाही’, असं मांडणं कठीण आहे. पुढची पन्नास मिनिटं परिस्थतीमागचं राजकीय विज्ञान समजून घेऊ’, असं म्हटलं तर कोणी उभंच करणार नाही. त्यात गेल्या काही वर्षांत सत्ता-बडे उद्योजक-वाहिन्यांचे मालक असे भक्कम सोन्याचे पिंजरे तयार झालेत. एक तर त्यातली रसाळ फळं खा, नाहीतर भुर्रकन आकाशात उडून जा, असे पर्याय तुम्हाला मिळतात.

तिकडे उन्हात कंटाळलेले आणि असाइनमेंटच्या ससेमिर्‍याने वैतागलेले फील्ड रिपोर्टर्स, खातरजमा न करता ‘मनमानी’ ब्रेकिंगचा रतीब घालत असतात. ’अमित शहा व्हिडिओ कॉन्फरन्सवरून बोलत आहेत’, ‘फडणवीस हॉटलाइनवरून मोदींशी बोलत आहेत’, ’काँग्रेसचे पटेल आणि सेनेच्या ठाकरेंची ऐतिहासिक भेट’ ही त्यातीलच काही उदाहरणे.
 
हे कमी म्हणून की काय, एखाद्याची संथ, शांत बाइट स्क्रीनवर दिसत असतानाही अमक्यांनी तमक्यांवर फोडलं खापर’, तमक्यांनी अमक्यांवर ओढले ताशेरे’अशी जळजळीत फोडणी घालतच असतात. ‘तमके अमक्यांच्या भेटीला’ असल्या खोट्या बातमीची मजा तमके आणि अमके आपापल्या निवासस्थानी बसून बिनधास्त घेताना दिसत होते. वाहिन्यांच्या ससेमिर्‍याने हैराण दादा बारामतीला निघालो सांगताच - आघाडीतील बिघाडीची ब्रेकिंग होते आणि समान किमान कार्यक्रम बाजूला सारून नेत्यांना बैठक सुरू असल्याचे फोटो आणि व्हिडिओ बाहेर पाठवून डॅमेज कंट्रोल करावा लागतो. मराठी आणि राष्ट्रीय पत्रकारितेतही दुसरा पर्याय निवडलेले बेरोजगार काही कमी नाहीत, तेव्हा सोन्याच्या पिंजर्‍यात गुमान राहिलेले काय वाईट, या हिशेबाने कोणी बोललं, तर त्यालाही गैर ठरवणं कठीण आहे! पण या सगळ्या खेळात, वाहिन्यांच्या मालकांनाही दोष देण्याआधी क्षणभर थांबून विचारूया. हे काय आत्ता गेल्या तीन दिवसांत घडलं? वर्षानुवर्षं वाहिन्यांच्या पत्रकारितेचा दर्जा घसरतोच आहे. पण तरीही त्या चालू आहेत आणि तिथे जाहिरात केली, तर लोकांपर्यंत आपली वस्तू आणि सेवा पोचेल, असं उद्योगांना वाटत आहे. याचाच अर्थ त्या पाहिल्या जात आहेत, असा काढता येतो आणि याचाच कदाचित दुसरा अर्थ प्रेक्षक म्हणून तुमचा दर्जा घसरतो आहे, असाही असू शकतो. कदाचित प्रेक्षकालाच ह्या असल्या बातम्या म्हणजे खाजेसारख्या झाल्यात. सवय तर वाईट, पण केल्याची मजा येते... आणि कदाचित असंही असू शकेल, की या वाहिन्यांचा दर्जा आणि मांडणी ठरवणार्‍या मंडळींचा गैरसमज झालाय. तुम्हाला इलाज नाही म्हणून तुम्ही त्या पाहत आहात आणि त्याला मात्र असं वाटतंय, की तुमची लेव्हल’च ती आहे.

टीव्ही आला तेव्हा त्याला इडियट बॉक्स’ म्हटलं होतं. कौन बनेगा मुख्यमंत्री’चा खेळ कसाही चालो, पण या बॉक्समधून समोर येणारे वार्ताहर- अँकर -विश्लेषक इडियट आहेत की त्यांना पाहणारे तुम्ही, का या दोघांचा सुज्ञपणा समजू न शकलेले या वाहिन्यांचे सूत्रधार? या प्रश्नावर थोडा विचार व्हायला पाहिजे, ब्रेकिंग न्यूज’ न करता...