Your Own Digital Platform

किल्ले प्रतापगडावर शिवप्रतापदिन उत्साहात साजरा

किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयावर हेलिकॉप्टरद्वारे अवकाशातून पुष्पवृष्टी करण्यात आली. (छाया: अतुल देशपांडे, सातारा)

स्थैर्य, सातारा : जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात किल्लेप्रतापगडावर शिवप्रतापदिन शासनाच्या वतीने पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी महाराष्ट्राच्या विविध भागातून शिव प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते .या वेळी शासनाच्या वतीने जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणा, पोवाडा, ढोल-ताशा-हालगी, तुतार्‍या, लेझीम यांचा गजर करीत चांदीच्या पालखीतून छत्रपती शिवरायाच्या प्रतिमेची निघालेली भव्य मिरवणूक तसेच रोमांच उभे करणारे शिवकालीन ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिक व छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयावर हेलिकॉप्टरद्वारे अवकाशातून करण्यात आलेली पुष्पवृष्टी या वैशिष्ट्यांसह आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रतापदिन उत्साहात साजरा करण्यात आला. भल्या पहाटे सुर्योदयाच्या साक्षीने मंगलमय वातावरणात सुरवात झालेल्या सोहळ्याने वातावरण भारुन गेले होते.
 
भल्या सकाळी सातारा अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक भवानी मातेला महा अभिषेक व महाआरती करण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते ,सी.ई .ओ .संजय भागवत,अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील , निवसी उप जिल्हाधिकारी सुनील थोरवे ,समीक्षा चंद्राकार , वाईच्या उपविभागीय अधिकारी संगीता राजापूरकर ,उप वन संरक्षक भरतसिंग ह्ड्डा, प्रभारी वन क्षेत्रपाल महेश झांझुरणे, माजी आमदार नितीन शिंदे , प्रतापगड चे सरपंच रविकांत मोरे ,महाबळेश्वर तहसीलदार सुषमा चौधरी पाटील , मुख्याधिकारी सौ.अमिता दगडे -पाटील, गटविकास अधिकारी घोलप, निवासी नायब तहसीलदार सोनावणे ,प्रदीप सावंत , श्रीकांत तिडके , आनंदा उतेकर ,चंद्रकांत उतेकर ,विलास मोरे , सुरेश सावंत आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात व षोडशोपचारे पुजा बांधण्यात आली. भवानी मातेचे पारंपारिक सेवेकरी विजय हवालदार , नरहरी चिंतामण हडप , भवानी माता मंदिर व्यवस्थापक मोहनराव बडवे तसेच विविध खात्याचे अधिकारी व प्रतापगड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
भवानी मातेच्या मंदीरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतीक असणार्‍या भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच रविकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ढोल, तुतार्‍या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला.
 
त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची शिवमुर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणुक सुरु झाली. अप्पर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली, श्री. छ.शिवाजी विद्यालय कुंभरोशीच्या मुलामुलींचे लेझीम- तुतार्‍या, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणार्‍या विद्यार्थ्यांच्या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदूमून गेला होता .
शिव प्रतिमेची पालखीतून मिरवणूक शुभारंभ प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,वाई प्रांत संगीता राजापूरकर ,विजय हवालदार,पी आय.कोंडूबहिरी आदी दिसत आहेत. (छाया: अतुल देशपांडे, सातारा )

पालखीचे शिवरायांच्या आश्वारुढ पुतळयाजवळ आगमन झाल्यावर छत्रपती च्या पुतळयास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले. यावेळी ’ क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज ...., या ललकारींने, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारुन गेले होते. शिवपुतळयावरील ध्वजस्तंभावर मान्यवरांच्या हस्ते भगव्याचे ध्वजारोहण केले. यानंतर सातारा पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली. यानंतर शिव कर्तृत्वाचा महिमा सांगणारा जोशपूर्ण पोवाडा शाहीर शरद यादव यांनी सादर केला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली,पार व कुंभरोशी , श्री. छ.शिवाजी विद्यालय कुंभरोशीच्या मुलामुलींनी काठ्यावर उभे राहून कबड्डीचा खेळ ,फुटबॉल या खेळांची प्रत्याक्शिक्जे दाखविली व वाहवा मिळवली तसेच शिवरायांच्या कर्तुत्वाची महती सांगणार्‍या गीताचे समूह गायन केले . अतीत येथील छावा प्रतिष्ठानच्या युवकांनी सदर केलेले मर्दानी खेळ त्यात लाठी चालवणे, तलवारबाजी, दांडपट्टा, कुर्‍हाडबाजी, आगीचे खेळ आदी ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिक करुन उपस्थितांची मने जिंकली.
 
दरम्यान गेले 10 वर्षे सातत्याने शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयावर हेलिकॉप्टरद्वारे अवकाशातून पुष्पवृष्टी करण्यात येते .यावर्षीही हेलिकॉप्टरद्वारे अवकाशातून पुष्पवृष्टी करण्यात आली .त्याचा आनंद सोहळ्यासाठी उपस्थितांनी सर्वांनी घेतला.मात्र आज किल्ले प्रतापगडावर भरपूर वारे व ढगाळ हवा यामुळे पुष्पवृष्टीस सुमारे तास भर उशीर झाला.
 
यावेळी उप वन संरक्षक भरतसिंग हाड्डा, महाबळेश्वरचे प्रभारी वनक्षेत्रपाल महेश झानझुरणे ,संयुक्त वन व्यवस्थापन समिती प्रतापगड चे अध्यक्ष ,अन्य मान्यवर ,सभासद आदी उपस्थित होते.