Your Own Digital Platform

मनसेच्या एकमेव आमदाराच्या गाडीला अपघात, महागड्या कारचा चक्काचूरस्थैर्य, डोंबिवली :
मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या गाडीला गुरुवारी रात्री अपघात झाला. डोंबिवलीत ही दुर्घटना घडली असून गाडीच्या चालकाने वेळीच बाहेर उडी मारल्याने तो बचावला. अपघातात राजू पाटील यांच्या ७५ लाखांच्या आलिशान कारचा चक्काचूर झाला आहे.

राजू पाटील यांची कार निळजे आणि दातीवली रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या रोड ब्रिजवरुन खाली रेल्वे रुळांवर कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. विशेष म्हणजे, अपघात झाला त्यावेळी सुदैवाने कोणतीही रेल्वे रुळावरून ये-जा करीत नव्हती त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

खदिर इमामदार असे आमदार राजू पाटील यांच्या चालकाचे नाव असून तो आपल्या नातेवाईकाला डोंबिवली येथे सोडून पुन्हा पलावासिटीकडे येत होता. त्यावेळी कारवरचे नियंत्रण सुटून ती थेट दिवा पनवेल रेल्वे रुळावर कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आरपीएफ घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार रेल्वे रुळांवरून हटवण्यात आली.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला प्रमोद पाटील उर्फ राजू पाटील यांच्यारुपाने एकमेव विजय मिळाला आहे. राजू पाटील सध्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरात आहेत.