Your Own Digital Platform

गजानन हॉटेलवर अन्न व भेसळची तकलादू कारवाई?


कराडमध्ये खळबळ : खाद्य पदार्थात सापडले झुरळ


स्थैर्य, कराड : शहरातील दत्त चौकात नामांकित असणर्‍या गजानन रेस्टॉरंट व हॉटेलमध्ये ग्राहकास खाद्यपदार्थात झुरळ सापडले. त्यामुळे शहरात एकच गोंधळ उडाला. संबंधित ग्राहकाने ही महिती अन्न व औषधे प्रशासनाच्या अधिकर्‍यांना दिली. मात्र काही वेळात संबंधित ग्राहकांने रेस्टॉरंट चालक नातेवाईक असल्याचे सांगत पळ काढला. तर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकर्‍याने रेस्टारंटची रूटींग तपासणी असल्याचे सांगत काढता पाय घेतला. त्यामुळे सदरच्या कारवाईत तडजोड झाल्याची चर्चा शहर परिसरात होती.

कराड येथील दत्त चौकात प्रसिध्द असे गजानन रेस्टॉरंट आहे. दुपारी तीनच्या सुमारास कोल्हापूर येथील एक ग्राहक खाद्यपदार्थ खाण्यासाठी तेथे गेले होते. त्यांनी उडीद वडयाची ऑर्डर दिली होती. त्यांना देण्यात आलेल्या डीशमधील सांबरात झुरळ असल्याचे आढळून आले. त्यावेळी संबंधीत ग्राहकांने रेस्टारंटमध्ये मोठा गोंधळ घातला. रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थात झुरळ सापडल्याचा प्रकार घडल्याचे समजताच काही वेळातच नागरिकांसह लोकप्रतिनिधी हॉटेल परिसरात दाखल झाले. संबंधित ग्राहकाने अन्न व भेसळ विभागाला फोन केला असल्याचे ते स्वतः सातत्याने येणार्‍या प्रत्येक ग्राहकाला सांगत होते. त्यामुळे हॉटेल चालकाची पाचावर धारण बसली होती. काही वेळातच अन्न व भेसळ विभागाचे अधिकारी दाखल गजानन हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यामुळे गजानन हॉटेलवर मोठी कारवाई होणार अशी चर्चा सुरू झाली. अधिकारी, रेस्टॉरंट चालक, संबंधित ग्राहक यांची तब्बल तासभर चर्चा सुरू होती. अधिकर्‍यानेही रेस्टॉरंटची चांगलीच झाडाझडती घेतली. मात्र काही वेळाने खाद्यपदार्थात झुरळ सापडल्याचे सांगणारा ग्राहक रेस्टॉरंट चालक नातेवाईक असल्याचे म्हणत त्याने घटना स्थळावरून पळ काढला. असे असलेतरी रेस्टारंटमध्ये अन्न व भेसळ विभागाच्या अधिकर्‍याने जवळपास तासभर तळ ठोकला होता. सदरील नेमका प्रकार काय यांची उत्सुकता नागरिकांच्यात होती. मात्र, अन्न व भेसळ विभागाच्या अधिकर्‍याने संबंधीत हॉटेलची रूटींगची तपासणी आहे. हा आमचा कामाचाच भाग असल्याचे यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र पत्रकारांच्या यासंबंधीच्या विविध प्रश्नांना उत्तर न देता ते आपल्या चारचाकी गाडीतून निघून गेले.
 
तपासणी कामाचा भाग
कराड दत्त चौकातील गजानन रेस्टॉरंट संबंधी आमच्याकडे कोणत्याही प्रकारची कोणीही तक्रार केलेली नाही. रेस्टॉरंटची तपासणी करणे हा आमच्या कामाचा भाग आहे. त्यामुळे मी तपासणी केली आहे, बाकीचे मला काही माहिती नाही.
आर. आर. शहा
खाद्य सुरक्षा अधिकारी, सातारा