Your Own Digital Platform

सिद्धेश्वर कुरोली येथे वाळू चोरी प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल


स्थैर्य, कुरोली सिद्धेश्वर :  येथील गावच्या हद्दीत येरळा नदी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा करणार्‍या एक जेसीबी, एक डंपर  व तीन ब्रास वाळू आदींसह उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांच्या पथकाने कारवाई करत 30लाख12  हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चार जणांवर शासकीय कामात अडथळा, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, अवैध वाळूचे उत्खनन याबाबतचा गुन्हा वडूज पोलीस ठाण्यात  दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील कुरोली सिद्धेश्वर येथे बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी व त्यांच्या पथकाने दि. 16 रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास छापा टाकत येरळा नदी पात्रास लागून असणार्‍या मळवी नावाच्या शिवारात  स्वप्नील विलास देशमुख (वय-26),अक्षय अनिल भोईटे (वय-24)रा-कुरोली (सिद्धेश्वर) हे मिळून आले तर सदर ठिकाणाहून डंपर चालक नीलेश आनंदराव गोडसे(रा-वडूज) हा आपल्या ताब्यातील डंपर सोडून पळून गेला तर प्रमोद विश्वास देशमुख रा -कुरोली(सिद्धेश्वर) यानें अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण करून जेसीबी सह पळून गेला.परंतु पोलिसांनी जेसीबी पकडून आणला.

याबाबत बेकायदेशीर, बिगरपरवाना व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी चौघा विरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.