Your Own Digital Platform

अतिक्रमणे हटवण्यापूर्वी हॉकर्स संघटनेला विश्वासात घ्या


स्थैर्य, सातारा : सातारा शहरात नगरपालिकेने अतिक्रमणे हटवण्यापूर्वी हॉकर्स संघटनेला विश्वासात घ्यावे, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आज एका निवेदनाद्वारे अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याकडे केली. दरम्यान, आज हॉकर्सने पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

याबाबत हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष संजय पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, सातारा नगरपालिकेने बायोमेट्रिक सर्वे केला असून आत्तापर्यंत त्यामध्ये 150 जणांचा सर्वे झाला आहे. मुळात सातारा शहरातील हॉकर्सची संख्या असणारी यादी 2016 सालची आहे. नवीन यादी नुसार शहरामध्ये 540 हॉकर्स आहेत. हे सर्वजण न्यायालयात गेले असून याप्रकरणी न्यायालयाने सांगितले आहे की, हॉकर्ससंबंधी टाऊन वेल्डिंग स्थापन केली असून त्या समितीचे अध्यक्ष हे नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतात. मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावून त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे. अधिक माहिती देताना संजय पवार पुढे म्हणाले, सातारा शहरात देवी चौक, राजपथ मार्ग, मंगळवार तळे या परिसरात हॉकर्स नाहीत. राजवाडा चौपाटी, पारंगे चौक ते जिल्हा रुग्णालय जिल्हा परिषद परिसरात अधिकृत 540 हॉकर्स आहेत. या हॉकर्सचे अतिक्रमण काढण्यापूर्वी त्यांना विश्वासात घेतले जात नाही त्यांच्याशी चर्चा केली जात नाही, हॉकर्स यांना विश्वासात घेऊनच अतिक्रमणे काढावीत असे निवेदन अपर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. दरम्यान अधिकृत हॉकर्स यांचे अतिक्रमण हटविण्याच्या विरोधात आज संघटनेने पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.