Your Own Digital Platform

2 फेब्रुवारी रोजी साताऱ्यात 'वसंतोत्सव 2020'


पंचम चा चौदाव्या वर्षातील पहिला कार्यक्रम !

स्थैर्य, सातारा : गेली 13 वर्षे सातत्याने सातारा शहर आणि परिसरात परिसरात शास्त्रीय संगीत, वादन, नृत्य या कलांचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या पंचम ग्रुप तर्फे चौदाव्या वर्षाची सुरुवात एका अनोख्या कार्यक्रमाने केली जाणार आहे.

श्रेष्ठ गायक कै. पं. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त , "वसंतोत्सव 2020 " - वसंतराव एक स्मरण ! हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पंडित वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान तर्फे गेली अनेक वर्षे "वसंतोत्सव" पुणे आणि मुंबई येथे आयोजित केला जात आहे .यावर्षी श्रेष्ठ गायक पंडित वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त "वसंतराव एक स्मरण" हा कार्यक्रम पुणे व मुंबई व्यतिरिक्त दहा-बारा शहरांमध्ये करण्याचे योजिले आहे. त्यातील पहिला मान पंचम ग्रुप च्या कार्यकारिणीच्या प्रयत्नाने सातारा शहराने मिळविला आहे.

वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि आजचे आघाडीचे तरुण गायक राहुल देशपांडे हे हा कार्यक्रम सादर करणार आहेत. वसंतराव देशपांडे यांच्या सांगीतिक प्रवासाचा आढावा असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.
पंचम ग्रुप सातारा आणि वायोलिन अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने "वसंतराव एक स्मरण" हा कार्यक्रम होणार आहे. सदरचा कार्यक्रम रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2020 रोजी, सायंकाळी ठीक सहा वाजता यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभाग्रह, जिल्हा परिषद मैदान ,सातारा येथे होणार आहे.

या विशेष मैफिलीमध्ये राहुल देशपांडे यांच्या समवेत प्रियांका बर्वे या सह गायिका असणार आहेत. या कार्यक्रमामध्ये निखिल फाटक (तबला), आदित्य ओक (संवादिनी), सत्यजित प्रभू (सिंथेसायझर) , अमर ओक (बासरी) असे विविध गुणी कलाकार साथ-संगत करणार आहेत. वैभव जोशी आणि स्पृहा जोशी हे दोघेजण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. 

पंचम ग्रुपने गेली तेरा वर्षे अनेक दिग्गज कलाकारांच्या मैफिलीचे यशस्वीरित्या आयोजन केले आहे. गायन ,वादन आणि नृत्य या तीनही कलांचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न पंचम ग्रुप तर्फे केला जातो. गेल्या काही वर्षात उस्ताद झाकीर हुसेन, पंडित शिवकुमार शर्मा, उस्ताद शाहीद परवेझ, पंडित उल्हास कशाळकर, उस्ताद राशिद खान ,कौशिकी चक्रवर्ती, अश्विनी भिडे देशपांडे, शर्वरी जमेनिस अशा अनेक नामवंत कलाकारांनी आपली कला सादर केली आहे.

पंचम ग्रुपचा चौदाव्या वर्षातील "वसंतराव एक स्मरण " हा पहिला कार्यक्रम आहे .2020 या वर्षातील सभासद नोंदणी धूमधडाक्यात सुरू आहे. पंचम ग्रुप तर्फे एका वर्षात चार कार्यक्रमांचे आयोजन केले जाते . सभासद वर्गणी वार्षिक रुपये रुपये 1000 प्रति व्यक्ती अशी आहे. शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार या उद्देशातून या ग्रुपची स्थापना झाली आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना वार्षिक नोंदणीत भरघोस सवलत जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना वार्षिक सभासद वर्गणी फक्त रुपये सहाशे प्रति असणार आहे. वार्षिक सभासद नोंदणी ' देवकुळे वॉच कंपनी' मोती चौक, 'ड्रेस वेल ' नगरपालिका शॉपिंग सेंटर तसेच 'राज मेडिकल्स ' पोवई नाका सातारा येथे सुरू आहे. केवळ या कार्यक्रमासाठी पहिल्या काही रांगांमधील विशेष देणगी प्रवेशिका आणि बालकनी मधील देणगी प्रवेशिका फक्त 'बुक माय शो' या ॲप वर उपलब्ध असणार आहेत.

सातारकर रसिकांनी राहुल देशपांडे यांच्या या विशेष मैफिलीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन पंचम ग्रुपचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी यांनी केले आहे. कार्यक्रमासाठी 98 220 57 378 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.