Your Own Digital Platform

28 रोजी ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या तैलचित्राचे मुंबईत अनावरण


स्थैर्य, फलटण : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण व एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राचे अनावरण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई येथे मंगळवार, दिनांक 28 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. या समांरभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ भूषविणार असून यावेळी मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे त्यांच्या जन्मभूमीत पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदूर्ग येथे संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांच्या पुढाकाराने पहिले स्मारक उभारले आहे. मात्र 1829 मध्ये बाळशास्त्री जांभेकर ‘बॉम्बे नेटिव्ह स्कूल अँड बुक सोसायटी मुंबई’ येथे गणित अध्यापक होते. पुढे मार्च 1830 मध्ये ते डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी झाले. मार्च 1832 पासून ते पूर्णकाळ नेटिव्ह सेक्रेटरी झाले. नोव्हेंबर 1834 मध्ये एल्फिन्स्टन स्कूल मुंबई (टाऊन हॉल) येथे असिस्टंट प्रोफेसर झाले. त्यानंतर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते 1846 पर्यंत प्रोफेसर होते. तसेच पूर्वीच्या टाऊन हॉलमध्ये (आताच्या सेंट्रल लायब्ररीमधील मुंबई एशियाटिक सोसायटीमध्ये) संशोधक म्हणूनही त्यांनी 1841 ते 1846 पर्यंत काम केले. या कालावधीत त्यांनी या सोसायटीच्या जर्नल्समधून निबंध भारतीय शिलालेख, ताम्रपट, नाणी यावर लिहिले आहेत. या जर्नल्समध्ये असे लेख प्रसिद्ध करणारे ते पहिलेच भारतीय संशोधक ठरले आहेत. एल्फिन्स्टन महाविद्यालयातील पहिले भारतीय प्राध्यापक म्हणून कामही केले. ऐतिहासिक योगदान असलेल्या ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे तैलचित्र त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयात सन्मानपूर्वक लावून कर्मभूमीत बाळशास्त्रींचा सन्मान व्हावा यासाठी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.माधुरी कागलकर यांचे याकामी सकारात्मक सहकार्य लाभले असल्याचे सांगून वृत्तपत्रसृष्टीतील या गौरवशाली समारंभासाठी पत्रकार, वृत्तप्रेमी नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य माधुरी कागलकर व संस्थेचे कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी केले आहे.