Your Own Digital Platform

चवणेश्‍वर ग्रामस्थांच्या लढ्याला 60 वर्षांनी यशरस्त्याचा प्रश्‍न अखेर मार्गी; वनविभागाने परवानगी दिल्याने एक कोटी 36 लाखांची तरतूद

स्थैर्य, वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्‍यातील चवणेश्‍वर या निसर्गसंपदेने नटलेल्या गावास जिल्हा नियोजन समितीने पर्यटनस्थळाचा "क' वर्ग दर्जा देऊनही रस्त्याअभावी या ठिकाणचा विकास खुंटला होता. वन विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने गेली 60 वर्षे दिलेल्या लढ्याला अखेर यश आले असून वन विभागाने या रस्त्यास लेखी परवानगी दिली आहे. प्रशासनाच्यावतीने या रस्त्यासाठी एक कोटी 36 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून लवकरच या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरु होणार आहे.

कोरेगाव आणि वाई तालुक्‍याच्या सीमेवर असलेल्या ऐतिहासिक चवणेश्‍वर डोंगराचा पाया महान तपस्वी च्यवणऋषी यांनी घातला आहे. कोरेगाव तालुक्‍यात एकमेव डोंगरावर असलेले हे गाव इंग्रजी आठ अक्षरात वसले आहे. समुद्रसपाटीपासून 1300 मीटर उंचीवर असणाऱ्या या डोंगरावर अनेक औषधी वनस्पती आढळतात. निसर्गरम्य परिसर लाभल्यामुळे याठिकाणी व्यवसायाला चालना देण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून चवणेश्‍वर गावास जिल्हा नियोजन समितीने 20 वर्षांपूर्वी पर्यटनस्थळाचा "क' वर्ग दर्जा दिला. त्यानंतर याठिकाणी पवनउर्जा प्रकल्पही साकारला. त्या माध्यमातून चवणेश्‍वरच्या कायापालटाची मुहुर्तमेढ रोवली गेली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ना. रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ यांच्या प्रयत्नातून या गावात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. मात्र, करंजखोप ते चवणेश्‍वर या रस्त्याचा प्रश्‍न सुटता सुटत नव्हता. सुमारे सात किलोमीटरच्या या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी गेल्या 60 वर्षांपासून लढा सुरु केला होता. मात्र, वन विभागाच्या हद्दीतील सुमारे तीन किलोमीटर घाटरस्त्याचा प्रश्‍न सुटत नव्हता. वन विभागाने या रस्त्यास परवानगी नाकारल्याने पर्यटनस्थळाचा दर्जा मिळूनही म्हणावा तसा विकास होत नव्हता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना साताऱ्यातील दौऱ्यावेळी ना. रामराजे निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, तत्कालिन सरपंच नीता पवार यांनी त्यांची भेट घेऊन चवणेश्‍वरच्या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली होती. पवार यांनीही हा माझ्या भागातील प्रश्‍न असून तो मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिली होती. मात्र तरीदेखील रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लागत नव्हता.

आ. दीपक चव्हाण, मंगेश धुमाळ यांनी हा प्रश्‍न सोडवण्यासाठी परिश्रम घेवून बांधकाम विभाग, ग्रामपंचायतीकडून आवश्‍यक ती कागदोपत्री पूर्तता करुन वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठका घेऊन रस्त्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका मांडली. याठिकाणी श्री चवणेश्‍वर, जानुबाई, महादेव अशी पुरातन मंदिरे असून याठिकाणी मोठी वार्षिक यात्रा भरते. यात्रेसाठी विविध ठिकाणच्या सासनकाठ्या येतात. याशिवाय वर्षभर याठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. या गावाला जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने ग्रामस्थांची अडचण विचारात घेवून वन विभागाने परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या सर्व बाबींचा विचार करुन या रस्त्याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करुन अखेर वन विभागाने रस्त्याच्या कामास परवानगी दिली. ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने उभारलेल्या लढ्याला अखेर यश आल्याने आता चवणेश्‍वरचा रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लागणार असल्याने याठिकाणी येणाऱ्या भाविकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.

ऐतिहासिक महत्व, निसर्गसंपन्नता यामुळे चवणेश्‍वर पर्यटकांना निश्‍चितच भुरळ घालते. येथील चवणेश्‍वर आमचे देवस्थान असून मी आमदार नसतानाही नेहमी याठिकाणी येत होतो. गेल्या 10 ते 15 वर्षांत तर या गावाशी माझी जवळीक आणखीच वाढली. या गावाचा रस्त्याचा प्रश्‍न मिटावा, भाविकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात, यासाठी आम्ही केलेल्या प्रयत्नाला अखेर यश आले. या रस्त्यासाठी 99 लाख रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया करुन लवकरच हे काम सुरु होत आहे.
- दीपक चव्हाण, (आमदार फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघ)
वन विभागाच्या हद्दीत असल्यामुळे चवणेश्‍वरचा रस्ता होण्यात अडचणी होत्या. त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होत होती. जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषदेत रस्त्यांसाठी वारंवार आवाज उठवला. ना. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आ. दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर आणि मी वन विभागाकडील तांत्रिक अडचणी दूर करण्यात यशस्वी झालो. सुमारे 60 वर्षांपूर्वीचा प्रश्‍न सोडवण्यात आल्याचे समाधान आहे.

मंगेश धुमाळ, कृषी सभापती, जि. प. सातारा