Your Own Digital Platform

बारामती परिमंडलमध्ये 79 हजारांवर नादुरुस्त वीजमीटर बदलले


सातारा जिल्ह्यामधील 33 हजार मीटर्सचा समावेश


स्थैर्य, सातारा :  बारामती परिमंडलात विविध कारणांमुळे नादुरुस्त असलेले घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील वीजग्राहकांचे नादुरुस्त व सदोष आढळून आलेले 79 हजार 515 सिंगल व थ्री फेज वीजमीटर गेल्या एप्रिल महिन्यापासून बदलण्यात आले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील 33 हजार 510 वीजमीटर बदलण्यात आले आहेत.

वीजग्राहकांच्या तक्रारीप्रमाणे किंवा कर्मचाऱ्यांच्या पर्यवेक्षणात नादुरुस्त आढळून येणारे वीजमीटर त्वरीत बदलण्याची काळजी घ्यावी आणि मीटर बदलल्यानंतर त्यासंबंधी मोबाईल अ‍ॅपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करावी, असे निर्देश प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. सुनील पावडे यांनी दिले आहेत.
 
वीजग्राहकांना वेळेत व अचूक वीजबील मिळावे यासाठी महावितरणने केंद्रीय बिलींग पद्धत सुरु केलेली आहे. यासोबतच सर्व लघुदाब वीजमीटरचे रिडींग मोबाईल ॲपद्वारे घेण्यात येत आहे. या दोहोंमुळे रिडींग घेण्यापासून ते वीजदेयक ग्राहकांपर्यंतची पाठविण्याची प्रक्रिया गतीमान झालेली आहे तसेच त्यात अचूकता आली आहे. सोबतच अचूक बिलींगसाठी वीजमीटर महत्वाचा असल्याने मीटर बंद असणे, डिस्प्ले खराब होणे, वीजवापराच्या नोंदीमध्ये कमी-अधिक तफावत असणे असे नादुरुस्त वीजमीटर बदलण्यात येत आहे. नादुरुस्त मीटरमुळे ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा त्रास होतो. सोबतच महावितरणच्या महसुलाचे सुद्धा नुकसान होते. हे प्रकार टाळण्यासाठी बारामती परिमंडलमधील नादुरुस्त वीजमीटर तातडीने बदलण्याची कार्यवाही सुरु आहे.

नवीन वीजजोडणी तसेच नादुरुस्त वीजमीटर बदलण्यासाठी महावितरणकडे पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध आहेत. याशिवाय महावितरणने मटेरियल मॅनेजमेंटची प्रक्रिया ही ईआरपीच्या (एंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) माध्यमातून आॅनलाईन केली आहे. त्यामुळे साधनसामग्रीची उपलब्धता व पुरवठा ही प्रक्रिया वेगवान झालेली आहे. गेल्या एप्रिल महिन्यापासून सातारा जिल्ह्यातील महावितरणच्या कराड विभागात - 14903, फलटण – 4343, सातारा – 7908, वडूज – 3351 आणि वाई विभागात 3005 नादुरुस्त वीजमीटर बदलण्यात आले आहेत.