Your Own Digital Platform

8 लाख 50 हजार रुपये किमतीचे 22 तोळे सोने लंपास


स्थैर्य, सातारा : येथील सदरबझारमध्ये असणार्‍या भारत माता चौकातील एका फ्लॅटचे कुलूप तोडून, आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी 8 लाख 50 हजार रुपये किमतीचे 22 तोळे सोने लंपास केल्याची घटना घडली. या परिसरात कालच चोरट्यांनी घरफोडी करून 50 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लंपास केले होते. सलग दुसर्‍या दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या भागात पेट्रोलिंग करावे अशी मागणी होऊ लागली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नीलेश सुरेशराव सरनाईक (वय 37), मूळ रा. कोल्हापूर, सध्या रा. समर्थ प्लाझा, फ्लॅट नं. 2, भारतमाता चौक, सदरबझार, सातारा हे पत्नी वृषाली सरनाईक आणि दोन मुलांसमवेत भाड्याने राहतात. नीलेश सरनाईक हे येथील मुथा कंपनीमध्ये काम करतात तर पत्नी ऋषाली या गृहिणी आहेत. त्यांचा एक मुलगा येथील निर्मल कॉन्व्हेंट तर दुसरा मुलगा शाहू अ‍ॅकॅडमी येथे शिक्षण घेत आहे.
आज सकाळी नीलेश सरनाईक हे मुलांना शाळेमध्ये सोडून कंपनीमध्ये गेले. वृषाली सरनाईक या सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास फ्लॅटला कुलूप लावून मुलांना शाळेतून घरी आणण्यास गेल्या. मुलांना शाळेतून घेऊन त्यांनी एका हळदी- कुंकू समारंभाला उपस्थिती लावली. तेथून त्या 12 वाजण्याच्या सुमारास फ्लॅटवर आल्या असता चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी घरात जाऊन बेडरूमची पाहणी केली असता बेडरूममध्ये असलेली तिजोरी फोडून त्यामधील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ही बाब पती नीलेश सरनाईक यांना मोबाईलवरून सांगितली. नीलेश सरनाईक तत्काळ फ्लॅटवर दाखल झाले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन फ्लॅटची पाहणी केली व घटनास्थळाचा पंचनामा केला.