Your Own Digital Platform

निढळ गावाचा विकास पाहण्यासाठी 95 अधिकारी देणार भेट


स्थैर्य, सातारा : निढळ गावाच्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी 34 उपजिल्हाधिकारी 32 तहसीलदार आणि 29 नायब तहसीलदार असे एकूण 95 वर्ग – 1 चे अधिकारी आणि वर्ग- 2 मध्ये नवीनच निवड झालेले शासकीय अधिकारी दि.16 जानेवारी 2020 रोजी निढळ गावास भेट देणार आहेत .यामध्ये 20 महिला अधिकारी यांचाही समावेश आहे, अशी माहिती सेवानिवृत्त आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 2017 आणि 2018 या वर्षी झालेल्या स्पर्धा परीक्षेतून संपूर्ण महाराष्ट्रातून यशस्वी झालेले हे सर्व अधिकारी आहेत . गावातील व पंचक्रोशीतील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आणि विध्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अपूर्व संधी आहे . यशदा येथे या सर्व अधिकाऱ्यांना श्री. दळवी यांनी नुकतेच 'झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल ' आणि 'शासकीय अधिकारी म्हणून जनहिताचे व प्रभावी काम कसे करावे ' या विषयावर प्रशिक्षण दिले आहे.

एक दिवसाच्या दौऱ्यामध्ये हे अधिकारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व विकास कामांची पाहणी करतील व विविध पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधतील. सांयकाळी 5 वाजता ग्रामपंचायत सभागृहामध्ये या अधिकाऱ्यांचे शंका निरसन व मार्गदर्शन असा कार्यक्रम असेल . सांयकाळी 6 ते 7 वा. पर्यंत निढळ मधील व पंचक्रोशितील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण व तरुणीं सोबत हे 95 नवनियुक्त तरुण अधिकारी चर्चा, प्रश्नोत्तरे व मार्गदर्शन करतील. या सर्व तरुण अधिकाऱ्यांशी आपल्या तरुणांना सवांद साधता येईल . तरी याचा गावातील व पंचक्रोशितील तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. दळवी यांनी केले आहे.