Your Own Digital Platform

सह्याद्री कारखान्याची निवडणूक जाहीर


कराड : राज्याचे सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील चेअरमन असलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी पुढील महिन्यात नऊ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून यासाठी आजपासून १० जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक पदांची संख्या २१ आहे. कराड, तळबीड, उंब्रज, कोपर्डे हवेली, मसूर, वाठार किरोली या गटांसह महिला राखीव, अनुसूचित जाती - जमाती, भटक्या विमुक्त जाती -जमाती, इतर मागास प्रवर्ग यातून हे संचालक निवडले जाणार आहेत. कराड, तळबीड, मसूर आणि वाठार किरोली या गटातून प्रत्येकी तीन संचालक निवडले जाणार आहेत. तर उंब्रज, कोपर्डे हवेली या गटातून प्रत्येकी दोन संचालक निवडले जाणार आहेत. तसेच महिला राखीव गटातून दोन महिला संचालकांनाही काम करण्याची संधी मिळणार आहे.

आजपासून १० जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवडणूक अर्ज दाखल करता येणार आहेत. १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक अर्जांची छाननी होणार आहे. तर १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. यानंतर २९ जानेवारीला उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे.
 
यानंतर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीसाठी ९ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यानंतर १० फेब्रुवारीला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे