Your Own Digital Platform

सातारा एमआयडीसीत कंपनीत आग, तेलाच्या डब्यांमुळे आग भडकली99 लाख 12 हजार 420 रुपयांचे नुकसान, पाच तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण

स्थैर्य, सातारा : सातारा औद्योगिक वसाहती ( जुनी ) मध्ये एनटेक्स ट्रान्सपोर्टेशन अँड सर्विस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास अचानक आग लागल्याने तब्बल एक कोटी रूपयांची मालमत्ता भस्मसात झाली . या आगीची झळ लगतच्या दोन कंपन्याना बसली .आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनं यंत्रणांना तब्बल पाच तास लागले .आगीचे नक्की कारण मात्र समजू शकले नाही .

सातारा रहिमतपूर रस्त्यावर जुनी एमआयडीसी येथे एनटेक्स ट्रान्सपोर्ट व सर्विस चे मोठे गोडाऊन व कार्यालय आहे . या कंपनी लगत पत्रावळ्या बनवणाऱ्या एका छोटया कंपनीचे युनिट आहे . मंगळवारी पहाटे तीन वाजता एनटेक्स कंपनीच्या गोडाऊनला अचानक आग लागली . एका बाजूने पत्रा व आतमध्ये जेमिनी तेलाचे डबे तसेच इतर किराणा माल साहित्य होते . त्यामुळे आग प्रचंड वेगाने पसरून आगीचे मोठे लोळ उठण्यास सुरवात झाली .लगतच्या दोन कंपन्या ना सुध्दा या आगीची झळ बसून तेथे काही यंत्रे व पत्रावळी बनवण्याचे साहित्य जळून खाकं झाले . एनटेक्स कार्यालयात हाताच्या बोटावर च कामगार होते . आग भडकताच त्यांनी बाहेर धाव घेतली . आगीच्या घटनास्थळी पहाटे साडेतीन वाजता सातारा पालिकेच्या दोन अग्निशमन गाडया व कूपर कारखान्याची एक अग्नीशमन दलाची गाडीवरच्या दहा जवानांनी आग विझवण्याचा अथक प्रयत्न केला .आगीची धग प्रचंड मोठी होती , आगीच्या ज्वाळा गोडाऊन पासून थेट कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत जात होत्या . सुदैवाने कंपनीत हाताच्या बोटावर च कर्मचारी असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही . सकाळी सव्वाआठ पर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याची अग्नीशमनं जवानांची कसरत सुरू होती . अमित पेपर कंपनीचे कर्मचारी अमित रघुनाथ सूर्यवंशी यांनी मंगळवारी दुपारी सातारा एमआयडीसी पोलीस चौकीत येऊन या घटनेची खबर दिली . पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला . या आगीमध्ये तीन कंपन्यांचे मिळून 99 लाख 12 हजार 420 रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले .