Your Own Digital Platform

१४ वर्षांखालील ६५ वी राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे दि. १ ते ५ फेब्रुवारी दरम्यान घडसोली मैदान फलटण येथे आयोजन : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर


फलटण  : महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन यांच्यावतीने १४ वर्षांखालील ६५ वी राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे आयोजन दि. १ ते ५ फेब्रुवारी दरम्यान घडसोली मैदान फलटण येथे करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
 
६५ वी राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे नियोजन व विविध कमिटी यांच्या स्थापना करण्यासाठी बैठकीचे आयोजन मुधोजी हायस्कूल फलटण येथे करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा क्रिडा अधिकारी युवराज नाईक फलटण तालुका किडा अधिकारी अनिल सातव क्रिडा मार्गदर्शक महेश खुटाळे क्रिडा मार्गदर्शक प्रशांत पवार सातारा जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय अनपट माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर फलटण पंचायत समिती माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुका अध्यक्ष जयकुमार इंगळे नगरसेवक पांडूरंग गुंजवटे विश्वासदादा गावडे नजीरभाई शेख प्रशासन अधिकारी अरविंद निकम फलटण एज्युकेशन सोसायटीचे क्रीडा समिती अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर राहुल निंबाळकर यांची उपस्थिती होती.
 
फलटण येथे महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन यांचेवतीने यापूर्वी राष्ट्रीय खो खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून यावर्षी फलटण येथील राष्ट्रीय खो खो स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.
 
फलटण येथे वरीष्ठ गटाची राष्ट्रीय खो खो स्पर्धा घेतली जावी अशी महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनची अपेक्षा होती तथापी १४ वर्षांखालील राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे आयोजन आता फलटण येथे करण्यात येणार असून या स्पर्धेसाठी संपूर्ण भारत देशातील विविध राज्यांतील खो खो संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून आपण सर्वांनी या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा श्रीमंत संजीवराजे यांनी व्यक्त केली.
 
१४ वर्षांखालील ६५ वी राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे आयोजन यापूर्वी अमरावती येथे करण्यात येणार होते तथापी तेथील नियोजन अपूर्ण असल्याचे कारणावरून ही स्पर्धा फलटण येथे घ्यावी असे महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विनंती केल्याने या स्पर्धा फलटण येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे सातारा जिल्हा क्रिडा अधिकारी युवराज नाईक यांनी सांगितले.

१४ वर्षांखालील ६५ वी राष्ट्रीय खो खो स्पर्धा दि. १ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत फलटण येथील घडसोली मैदानावर घेण्यात येणार असून भारतातील विविध राज्यांतील ३० संघ सहभागी होणार आहेत. खेळाडू यांचे सरावासाठी २ मैदाने व खो खो स्पर्धेसाठी ४ मैदाने तयार करण्यात येणार आहेत. स्पर्धेत १५४ ते १७४ मॅचेस सूपर लिग पद्धतीने खेळल्या जाणार असून ९५० खो खो खेळाडू कोच प्रशिक्षक अधिकारी व कर्मचारी आणि शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या राहण्याची भोजनाची सोय तसेच त्यांची सुरक्षितता याबाबत व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सातारा जिल्हा क्रिडा अधिकारी युवराज नाईक यांनी सांगितले.
 
६५ वी राष्ट्रीय खो खो स्पर्धा फलटण येथे आयोजित करण्यात आली असल्याने विविध राज्यांतील प्रेक्षक व खो खो प्रेमी नागरिक व विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होणार असल्याने स्पर्धा पाहण्यासाठी प्रशस्त गॅलरी तयार करण्यात येणार असून त्याचबरोबर मुख्य स्टेज ५०/६० फुट उंच उभारण्यात येणार असल्याचे सांगून दि. २० फेब्रुवारी पर्यंत मैदाने तयार करण्यात येणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. बैठकीला फलटण सातारा व महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी व अनेक आजी माजी खो खो खेळाडू उपस्थित होते. 

शेवटी सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी आभार मानले.
 
प्रारंभी फलटण तालुका क्रीडा अधिकारी गजानन पाटील यांचे अपघाती निधन झालेबद्दल त्यांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहीली.