Your Own Digital Platform

गटातील खडे बाजूला काढणार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर


स्थैर्य, फलटण : मी जो खासदार झालो आहे ते फक्त आणि फक्त सर्व कार्यकर्ते यांच्या जीवावर झालेले आहे. तरी गटातील ज्यांना बाहेर जायचे आहे त्यांनी लवकर बाहेर जावा. आगामी काही दिवसात गटातील खडे बाजूला करणार आहेच. त्या आधीच कुणाला बाहेर जायचे असेल बिनधास्त बाहेर जावे म्हणजे माझे काम कमी होईल. जे कार्यकर्ते माझ्या सोबत येतील त्यांच्या बरोबर व जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय आता पुढील वाटचाल सुरू ठेवणार आहे असे मत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मकरसंक्रांती निमित्त लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की आपण ज्या वेळी नवीन घर बांधतो त्या वेळी घरातील सर्व गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. त्याप्रमाणे आपण आपला गट नव्याने बांधत असून गटासाठी लागणार्‍या सर्व गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस कार्यकर्ते आमच्याबरोबर राहिले आहेत, त्याचप्रमाणे आता कायमस्वरूपी आम्ही कार्यकर्त्यांबरोबर आहे हे सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे. आगामी काळामध्ये येणार्‍या सर्व निवडणुका मग ती ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो आपण ताकदीने लढवणार असून तुमच्यापैकीच कार्यकर्ते भविष्यातील पदाधिकारी असणार आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवावे.
 
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी आभार मानले.