Your Own Digital Platform

नागरिकांच्या दारी जावून योजनांचा लाभ हेच महाराजस्व अभियानाचा उद्देश - अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदेस्थैर्य, सातारा : शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहे, अशा नागरिकांच्या दारी जावून विविध योजनांचा लाभ देणे हा महाराजस्व अभियानाचा उद्देश आहे. या अभियानात नागरिकांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती देवून त्यांना अभियानस्थळी लाभ देण्यात येणार आहे. या अभियानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी केले.

महाराजस्व अभियान 2020 अंतर्गत आज सातारा तालुक्यातील कारंडवाडी येथे विस्तारीत समाधान योजना शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन आज अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, तालुका कृषी अधिकारी अजित पिसाळ, जिल्हा परिषद सदस्य अर्चना देशमुख, पंचायत समितीच्या सभापती सरीता इंदलकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे, प्रिया शिंदे, कारंडवाडीच्या सरपंच वनिता खंडझोडे, देगावचे सरपंच गणेश रोकडे आदी उपस्थित होते.

नागरिकांना विविध योजनांच्या लाभासाठी व दाखल्यांसाठी विविध शासकीय कार्यालयाना जावे लागते त्यांचे वेळेतच काम होते, असे नाही. शासकीय योजनांचा लाभ व विविध दाखले देण्यासाठी आज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून प्रशासन आपल्या दारी आले असून विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करावेत यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या अभियानांतर्गत संजय गांधी निराधार योजनेचाही स्टॉल लावण्यात आलेला आहे. याचा गरजु महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी शेवटी केले.

शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहचवून गरजुंना योजनेचा लाभ देणे महाराजस्व अभियानाचा उद्देश आहे. या अभियानात आज 35 प्रकारचे दाखले देण्यात येणार असून जे दाखले येथे देणे शक्य नाही अशी दाखले 15 दिवसात देण्यात येणार आहेत. तसेच या अभियानात नागरिकांनी उपस्थित केलेल्या शंकाचेही निरसण करण्यात येणार आहे. यापुढे महाराजस्व अभियान प्रत्येक मंडलनिहाय आयोजित करण्यात येणार असल्याचेही प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी यावेळी सांगितले.

ज्या नागरिकांना विविध योजनांच्या लाभासाठी व दाखल्यांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये जाण्यास अडचणी येतात, अशा नागरिकांना लाभ देण्यासाठी महाराजस्व अभियान खूप महत्वाचे आहे. या अभियानांतर्गत एकाच छताखाली सर्व विभागांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. या अभियानांतर्गत विविध योजनांच्या लाभाबरोबर नागरिकांना लागणारे सर्व प्रकारचे दाखले देण्यात येणार असल्याचे प्रास्ताविकात तहसीलदार आशा होळकर यांनी सांगितले.

या शिबीरामध्ये जिल्हा परिषद सदस्य अर्चना देशमुख, पंचायत समितीच्या सभापती सरीता इंदलकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे, प्रिया शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या शिबीरास विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह कारंडवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.