Your Own Digital Platform

पानिपतचा होमकुंड असाच जागता ठेवा- विश्वास पाटील


स्थैर्य, सातारा : पानिपत या ठिकाणी १४जानेवारी १७६१ला झालेल्या युद्धासारखं दुसरं रणमैदान झालंच नाही .महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावातून या युद्धात लढणारे वीर होते .परंतु कण्हेरखेड सारखं दुसरं गाव नाही . या गावातील अनेक वीर या युद्धात हुतात्मा झाले . यामुळे या गावाने पानिपत चा होमकुंड असाच जागता ठेवा .असे प्रतिपादन विश्वास पाटील यांनी केले.

कण्हेरखेड ता.कोरेगाव येथे पानिपतचा रणसंग्रामाला २५९ वर्ष झाली. या स्मृती जागवण्यासाठी ,या युद्धात हुतात्मा झालेल्या विर योद्ध्यांचा पराक्रम पुढच्या पिढीला कळावा यासाठी पानिपत शौर्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस निरीक्षक धीरज पाटील ,कोंडाजी फर्जद यांची भूमिका केलेले आनंद काळे , सभापती राजाभाऊ जगदाळे, रणजित गरुड , शिवाजीराव शिंदे , सरदार मिस्त्रीकर, हर्ष राज शिंदे , संजय पाटील शिरोळकर , प्रा पांडुरंग शिंदे ,अर्जुन मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

बोलताना पुढे ते म्हणाले, पानिपतची लढाई हिंदुस्तान रक्षणाकरता झालेली लढाई आहे. सर्व जाती धर्म पंथ या लढाईत लढत होते फक्त मराठा धर्म म्हणूनच .आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य वाढावे यासाठीच . याच दिवशी सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत दोन्ही बाजुकडील त दीड लाख माणसं , जवळपास ऐंशी हजार जनावरे मृत्युमुखी पडले .असा संहार जगाच्या पाठीवर कुठेही झाला नव्हता .जवळपास तीन आठवडे अन्न पाण्यावाचून हाल झालेल्या भाऊ पेशव्यांच्या सैन्याला बाहेरून कोणतीच मदत मिळाली नाही .झाडपाला खाऊन सैन्य लढाई करत होते आणि त्यात निसर्गाची हि साथ मिळाली नाही .या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला ,तरीही भविष्य जिंकले .युद्ध जिंकूनही अब्दुलशहा अब्दाली मराठ्यांच्या लढवय्यी पणाचे कौतुक करून गेला मराठ्यांची पराक्रमाची गाथा अजरामर करून गेला .पानिपतचे युद्ध हरल्यानंतर याच मातीतील महादजी शिंदे यांनी परत एकदा दिल्लीवर मराठ्यांचा झेंडा फडकवला व या युद्धास कारणीभूत असणाऱ्या नजीबखानाची कबर उकरून टाकली होती. हा इतिहास या गावचा आहे .

कार्यक्रमाची सुरवात शहिदांच्या स्मरणार्थ उभ्या असलेल्या सोळा खांबी स्मारक व चार खांबी स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली .पानिपतवरून तिथल्या मातीचा कलश सध्या पानिपत परिसरात राहत असलेल्या मराठ्यांनी आणला होता. तो कलश कण्हेरखेड चे सरपंच संजय शिंदे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला .मावळा प्रतिष्ठान अतित च्या कार्यकर्त्यांनी तलवार दांडपट्टा लाठीकाठी च्या चित्तथरारक कसरती केल्या .पियुषा भोसले या मुलीने संभाजी महाराजावर पोवाडा म्हणून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास महाराष्ट्रातील अनेक गावातील शिंदे कुटुंबीय सहकुटुंब उपस्थित होते .प्रस्ताविक डॉक्टर संग्राम शिंदे आभार अॅड . विजय शिंदे यांनी मानले.