Your Own Digital Platform

मेशी अपघातातील मृतांचा आकडा २५ वर


नाशिकच्या देवळा अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत - उद्धव ठाकरे

स्थैर्य, नाशिक : नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशी गावानजीक रिक्षा आणि बस विहीरीत कोसळून मंगळवारी झालेल्या अपघातातील मृतांची संख्या २५ झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. रात्री दोन वाजेपर्यंत हे मदतकार्य सुरू होते. मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

धुळे-कळवण (एमएच ०६, ८४२८ ) ही बस मालेगावहून कळवणच्या दिशेने जात असताना मालेगाव-कळवण रस्त्यावर मेशी फाटा येथे दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत रिक्षा आणि त्यापाठोपाठ बस कोसळल्याने प्रवासी खाली पाण्यात दाबले गेले. अपघाताचे वृत्त समजताच मेशी, देवळा, दहिवड, खरिपाडा येथील नागरिक, देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी मदतीसाठी धाव घेतली.

मालेगावजवळील चंदनपुरी येसगाव येथील रशीद अंजूम अन्यारी (वय २५) या तरुणाचं लग्न ठरवण्यासाठी त्याच्या परिसरातील सदस्य देवळा येथे अॅपे रिक्षाने गेले होते. काही दिवस आधी रशीद जावून आला होता. त्याला मुलगी पसंद असल्यामुळे तो मंगळवारी घरीच होता. देवळ्याहून परतताना रिक्षा आणि बसचा अपघात झाला. या अपघातात बसचालक प्रकाश बच्छाव (रा. भेंडी ता. कळवण), रिक्षाचालक नाना शांतीलाल सूर्यवंशी (वय २५, रा. येसगाव,ता. मालेगाव) यांचा मृत्यू झाला. मृतांपैकी काही जण रशीदचे नातेवाईक असल्याची माहिती आहे.

रात्री दोन वाजेपर्यंत हे मदतकार्य सुरु होते. हाती लागलेल्या मृतदेहांची ओळख पटविण्याचे कामही केले जात होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या २५ झाली आहे. ओळख पटलेले मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. प्रवाशांच्या नातलगांसाठी 02592228209 या क्रमांकावर हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.दहा लाखांची मदत जाहीर 
नाशिकजवळ झालेल्या या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दहा लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य परिवहन महामंडळाकडून केला जाणार असल्याची माहिती परिवहन संसदीय कार्य तथा अध्यक्ष राज्य परिवहन महामंडळ अ‍ॅड.अनिल परब यांनी दिली.