Your Own Digital Platform

पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करायला लावणार खा. सुप्रिया सुळे


आदर्श पत्रकार निलेश खरे, दै. महासत्ताचे शरद काटकर यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना खा. सुप्रिया सुळे, आ. मकंरद पाटील, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, जि.प. अध्यक्ष उदय कबुले व इतर

आदर्श पत्रकार निलेश खरे, जीवन गौरव पुरस्काराने दै. महासत्ताचे शरद काटकर सन्मानित

स्थैर्य, खंडाळा :महाराष्ट्र राज्यात पत्रकार संरक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील, असे प्रतिपादन खा. सुप्रिया सुळे यांनी केले. खंडाळा तालुका मराठी पत्रकार संघ, पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार आणि जीवन गौरव पुरस्कार वितरण व गुणवंत कर्मचारी यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आ. मकरंद पाटील, जि. प. अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, माजी कृषी सभापती मनोज पवार, जि.प. सदस्य सौ. दिपाली साळुंखे, उपसभापती वंदना धायगुडे, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष दत्तानाना ढमाळ, पुरुषोत्तम जाधव, तहसिलदार दशरथ काळे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, गटशिक्षण अधिकारी गजानन आडे, विनोद कुलकर्णी, अजय भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी साम टि व्हीचे संपादक निलेश खरे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार तर दै. महासत्ताचे जिल्हा प्रतिनिधी आणि सातारा जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष शरद काटकर यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. खा. सुळे म्हणाल्या, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे आपल्या सर्वांवर संस्कार आहेत. आपले महाआघाडीचे सरकार नवीन ऊर्जेने विश्‍वासाने राज्यातील सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करेल. महिला, अंगणवाडी सेविका, आशा वर्क, बचतगट यांचे सगळे प्रश्‍न प्राधान्य देवून सोडवले जातील.
नव्या सरकारमध्ये पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीविषयी सकारात्मक पावले टाकण्याविषयी धोरण ठरवले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. खा. सुळे पुढे म्हणाल्या, आ. मकरंद पाटलांसारख्या लोकप्रतिनिधीवर जनता व पत्रकार एकत्रितपणे एवढे प्रेम करू शकतात हे खंडाळ्यात पहायला मिळाले. खंडाळा पत्रकार संघाने उत्तम कार्यक्रम केल्याचे समजले. जिथे जिथे आमच्या महाआघाडीच्या सरकारकडून चुका होतील. तिथे तिथे आपण निश्‍चितपणे त्या दाखवून द्याव्यात असे ही त्यांनी सांगितले. 

आ. मकरंद पाटील म्हणाले, समाजाचा आवाज दर्पणाच्या माध्यमातून मांडण्याचे काम झाले. प्रसार माध्यम समाजाचे डोळे म्हणून काम करतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ ही समाजाची भूमिका मांडतात. आदर्श व्यक्तींचा सन्मान म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. खंडाळा तालुका पत्रकार संघाने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार, जीवनगौरव पुरस्कार देवून राज्यात आदर्श निर्माण केला आहे.

तेजस्वी सातपुते म्हणाल्या, एका उत्कृष्ट कार्यक्रमाला सुप्रिया सुळेंसमवेत येण्याची संधी मिळाली. एवढा भव्यदिव्य कार्यक्रम खंडाळ्यात होईल असे वाटले नव्हते. खंडाळा तालुक्यातील टीमने पत्रकारांचा पत्रकार दिनाचा हा सोहळा आयोजित करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेचे फार मोठे योगदान जिल्ह्याच्या जडणघडणीत आहे.
 
हरीष पाटणे म्हणाले, महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा झाला आहे. यापुढे पत्रकारांवर हल्ले झाले तर या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना सुप्रियाताईंनी गृहमंत्र्यांना द्याव्यात. राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना सरसकट अ‍ॅक्रीडेशन मिळाले पाहिजे. यासाठी आम्ही उभा करत असलेल्या लढ्याला सुप्रियाताईंनी पाठबळ द्यावे अशी विनंती त्यांनी केली. 

सत्काराला उत्तर देताना शरद काटकर म्हणाले, आ. मकरंद पाटलांना आमदार म्हणताना संकुचित वाटते त्यांना राष्ट्रवादीने नामदार करून त्यांच्या पवार घराण्यावरील निष्ठेची पोहचपावती त्यांना द्यावी. वडिलांचे मुलीवर प्रेम असते, त्याच प्रमाणे खा. शरद पवारांचे मुलीवरच प्रेम आहे. खा. सुप्रियाताई पवार साहेबांच्या कानात ही मागणी सांगून खंडाळा, वाई, महाबळेश्‍वर तालुक्यातील जनमानसातील भावना पोहचवावी आणि मकरंद पाटलांना मंत्रीपद द्यावे अशी विनंती करून ते म्हणाले, पत्रकारांनी बातम्यांच्या चौकटीत न राहता आपल्या ओळखीचा फायदा समाजासाठी करून योगदान द्यावे असे त्यांनी सांगितले. खंडाळा पत्रकार संघाने राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. 

यावेळी सत्कारमूर्ती निलेश खरे, जि.प.अध्यक्ष उदय कबुले, शिवसेनेचे नेते पुरूषोत्तम जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. बाबा लिमण यांनी सूत्रसंचलन केले. या कार्यक्रमात शंकरराव गाढवे, बकाजीराव पाटील, नितिन भरगुडे - पाटील, प्रा.एस.वाय. पवार, अनिरुद्ध गाढवे, राहुल घाडगे यांनी पत्रकारांना प्रारंभी शुभेच्छा दिल्या. यावेळी अ‍ॅड. शामराव गाढवे, पं. स. सदस्य शोभा जाधव, चंद्रकांत यादव, अश्‍विनी पवार, आदेश जमदाडे, प्रदीप माने, लता नरुटे, राजेंद्र चव्हाण, सुनील देशमुख उपस्थित होते. शशिकांत जाधव यांनी स्वागत केले. रमेश धायगुडे यांनी प्रास्तविक केले. संतोष पवार यांनी आभार मानले.