Your Own Digital Platform

पुणे शहरातील प्रश्नांचे बारकावे तपासून आपण काम करणार - आयुक्त शेखर गायकवाड


स्थैर्य, पुणे : पुणे शहरातील प्रश्नांचे बारकावे तपासून आपण काम करणार असल्याचे प्रतिपादन पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले . शंकरसेठ रोड येथील आनंद पार्क येथे भूमाता रौप्य महोत्सवी सांगता सोहळ्यामध्ये ते बोलत होते . पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले कि , प्रशासनात मिनिटामिनिटामध्ये मला प्रत्येक माणसाने शिकविले . एक एक माणूस शिकवीत आला आणि मी शिकत आलो . त्यामुळे पुणे महापालिका आयुक्त म्हणून कितीही लोक मला भेटायला आले तरी मी न कंटाळता काम करणार आहे . आपण १९९६ साली शेतकऱ्यांनो सावधान हे पहिले पुस्तक प्रकाशित केले . सध्या आपण " सरकारी योगायोग " हे पुस्तक लिहीत आहे . आपण साखर आयुक्त असताना आपण शेतकऱ्यांना एफ आर पी मिळवून दिली . पुणे शहरात काम करताना आपण शहरात वाहतूक सुरळीत चालण्यासाठी काम करणार आहे तसेच, नागरी प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार आहे . शहरात दुचाकी वाहनांसाठी वेगळे रस्ते तयार करणार आहे . तसेच शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये एन जी ओ ची मदत घेऊन सी एस आर मधून निधी उभा करून पर्यावरण पूरक बसेस घेऊन बदल करणार आहोत.

यावेळी निवृत्त जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी सांगितले कि , पुणे कृषी महाविद्यालयाचा विदयार्थी हा पुणे महापालिकेचा आयुक्त झाला . हि आनंदाची गोष्ट आहे . शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अठरा पुस्तके लिहिली आहेत . ते पुणे महापालिकेच्या अनुभवावर आधारित पुस्तक लिहतील . महापालिकेच्या विकासकामांमध्ये शेखर गायकवाड यांचा अनुभव फायदेशीर ठरेल . ते पुण्याच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण काम करण्यासाठी प्रत्येक विभागात स्वतः जाऊन माहिती घेत आहेत . त्यामुळे ते आपल्या कामाचा नक्कीच ठसा उमटवतील . पुणेकरांनी त्यांना साथ द्यावी असे आवाहन चंद्रकांत दळवी यांनी केले.

या कार्यक्रमामध्ये पुणे महापालिका आयुक्तपदी शेखर गायकवाड यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार निवृत्त जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह , शाल व पुष्पगुछ देऊन करण्यात आला . यावेळी भूमातेचे अध्यक्ष व कृषीतज्ञ डॉ बुधाजीराव मुळीक , शालिनी मुळीक , निवृत्त कर्नल संभाजी पाटील , नगरसेवक आबा बागुल , नगरसेविका कमल व्यवहारे , नगरसेविका कविता वैरागे , राजीव जगताप ,दि विश्वेश्वर बँकेचे अध्यक्ष सुनील र्रुकारी , राजेंद्र कोंढरे , शांताराम कुंजीर , यशवंत खैरे , कोल्हापूरचे वनअधिकारी सत्यजित गुजर , सहाय्यक पोलिस आयुक्त सर्जेराव बाबर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक नरेंद्र शिंदेकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रियांका जगताप यांनी केले तर आभार कमल सावंत यांनी मानले .