Your Own Digital Platform

आर्ट फेस्टिवल' सांस्कृतिक चळवळीसाठी दिपस्तंभ ठरेल - अभिनेते दीपक देशमुखआर्ट फ्युजन फेस्टिवलची दिमाखदार सुरुवात


स्थैर्य, सातारा : साता-यात रंगदेवतेच्या मंदिरात आर्ट फ्युजन फेस्टिवलच्या माध्यमातून तुषार भद्रे यांनी लावलेला नंदादीप सांस्कृतिक चळवळीसाठी दिपस्तंभ ठरेल, असा विश्वास येथील ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते दीपक देशमुख यांनी आर्ट फ्युजन फेस्टिवलच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केला.

तुषार भद्रे स्कुल ऑफ थिएटर अँड फिल्म आर्टच्या वतीने शाहू कलामंदिरात २ फेब्रुवारी अखेर आर्ट फ्युजन फेस्टिवल चालणार आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे सातार आकाशवाणीचे सचिन प्रभूणे, दैनिक पुढारीचे पत्रकार हरिष पाटणे, ज्येष्ठ रंगकर्मी व महोत्सवाचे संकल्पक तुषार भद्रे प्रमुख उपस्थित होते.

दीपक देशमुख म्हणाले, " साताऱ्यातील सांस्कृतिक चळवळीला प्रवाही ठेवण्याचे व दिशा देण्याचे काम रंगकर्मी तुषार भद्रे करत आहेत. आर्ट फ्यूजन फेस्टिव्हलच्या माध्यमातून रंगकर्मींना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे ही चळवळ पुढे चालवण्यासाठी आपण सगळ्यांनी अशा प्रकारच्या महोत्सवांना पाठबळ देऊ या."

वर्षा देशपांडे म्हणाल्या, "आर्ट फ्युजनसारखे असे महोत्सव झाले पाहिजेत कारण ही या शहराची सांस्कृतिक भुक अाहे. अशा कार्यक्रमातून पुढच्या पिढीला केवळ तंत्र न देता सांस्कृतिक मुल्येपण दिली पाहिजेत. कधी नव्हे ते अभिव्यक्तिस्वातंत्र्य, संस्कृती आदीवर सांस्कृतिक मर्यादा येऊ पहाताहेत. अशा विचित्र सामाजिक परिस्थितीत कला महोत्सव महत्त्वपूर्ण अाहे. प्रत्येकाने आपापले अभिनिवेष बाजूला ठेवुन हा महोत्सव वृद्धिंगत, रंगतदार करुया."

महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. अधिक सविस्तर माहिती देताना ज्येष्ठ रंगकर्मी व महोत्सवाचे संकल्पक तुषार भद्रे यांनी सांगितले की, देशात जशी आर्थिक मंदी आहे तशीच सांस्कृतिक मंदी जाणवते आहे. या मंदीचे परिणाम साता-यावर होऊ नये, यासाठीचा एक प्रयत्न म्हणून गेली ३ वर्षे आर्ट फ्युजन फेस्टिवलचे साताऱ्यात आयोजन केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
यावेळी सचिन प्रभुणे यांनी सातत्याने सातारच्या कलाविश्वाला वाहून घेऊन कार्य भद्रे करीत असून त्यांना सर्वांनी मोलाची साथ देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. पुढारी ब्युरो चीफ हरिष पाटणे यांनी नाट्य कलेचा संदर्भात तुषार भद्रे हे चालते बोलते मुक्त विद्यापीठ आहेत तर त्यांच्या प्रयत्नामुळे साताऱ्यात कधीच सांस्कृतिक मंदी येणार नाही, सर्व पत्रकार बांधव याकामी समर्थ साथ नक्कीच देतील व देत आहेत अशी ग्वाही दिली. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी संदीप जंगम दिग्दर्शित गजरा, रोहित-चैतन्य दिग्दर्शित पंचकम्, कैलास जाधव दिग्दर्शित कुरुवंडी करीन काया तर कैलास भापकर दिग्दर्शित शुभमंगल सावधान या चार एकांकिका सादर झाल्या. या एकांकिकांनी रसिकांची मने जिंकली.
 
एकपात्री अभिनय स्पर्धेत २६ कलावंतांनी भाग घेतला. रात्री सोलापूरच्या अस्तित्व मेकर्स या संस्थेचे अमोल साळवे लिखित व सागर देवकुळे दिग्दर्शित 'अर्धांगिनी' या दोन अंकी नाटकाच‍ा प्रयोग सादर झाला.

या नाटकाने राज्यनाट्य स्पर्धेत सोलापूर केंद्रात द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
 
महोत्सवात कधी काय

  
शुक्रवार दि. 31 : सायंकाळी ७ वाजता फिनिक्स क्रिएशन्स,कोल्हापूर या संस्थेचे लोकरंग-ढंगातील राहुल बेलापूरकर लिखित व संजय मोहिते दिग्दर्शित 'ह्येच्या आईचा वग' हे राज्यनाट्य स्पर्धा कोल्हापूर केंद्र प्रथम क्रमांक प्राप्त नाटक. 

 शनिवार दि. १ फेब्रुवारी : सायंकाळी ५ वाजता 'बालनाटयोत्सव' होईल. यात जगदीश पवार लिखित दिग्दर्शित गुहेतील पाखरं, सोलापूरचे 'सोनेरी पिंजऱ्यातील पोपट' व साताराचे 'खेळ मांडीयेला' ही तीन धम्माल बालनाट्ये होतील.

रविवार दि. २ फेब्रुवारी : सायंकाळी ७ वाजता अभिनय कल्याण-मुंबई संस्थेचे राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवात गाजत असलेले डॉ.आशुतोष दिवाण लिखित व अभिजित झुंजारराव दिग्दर्शित 'घटोत्कच' नाटक सादर होईल.

या प्रसंगी जुगलकिशोर ओझा व रविंद्र डांगे यांना जीवन गौरव तसेच रंगकर्मी अमित देशमुख यांना सातारा नाट्य गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल.